वृत्तसंस्था/ कराची
पाक क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू मोहमद हाफिज यांची पाकच्या निवड समिती प्रमुखपदी वर्णी लागण्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या पाकचा संघ लंकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यानंतर मोहमद हाफिजची पाकच्या निवड समिती प्रमुखपदी नियुक्ती जवळपास निश्चित झाल्याचे विश्वासनीय गोटातून सांगण्यात आले आहे.
पीसीबीचे क्रिकेट व्यवस्थापन समितीचे नवे चेअरमन झेका अश्रफ यांनी हाफिजला या पदासाठी आपली पहिली पसंती दर्शवली आहे. गेल्या जूनमध्ये पीसीबीची क्रिकेट व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यात आली होती. पाक क्रिकेट मंडळाच्या निवड समिती प्रमुख पदाच्या शर्यतीमध्ये मोहमद हाफिज, रशीद लतिफ यांची नावे आघाडीवर असली तरी रशीद लतिफने हे पद स्वीकारण्यास इच्छूक नसल्याचे समजते. माजी कर्णधार मोहमद हाफिजने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये 55 कसोटी, 218 वनडे आणि 119 टी-20 सामने खेळले असून गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती.









