सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करताच मनपाला जाग
बेळगाव : दीड दिवसाचे गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी भाविक कपिलेश्वर येथे गेले असताना त्यांना अंधाराचा सामना करावा लागला. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करताच महानगरपालिका खडबडून जागी झाली. तातडीने मंगळवारी विद्युतपुरवठा सुरळीत केला आहे. कपिलेश्वर तलाव परिसरात विसर्जन करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. मात्र त्याठिकाणी लावण्यात आलेले मोठे लाईट बंदच ठेवण्यात आले होते. दीड दिवसाचे गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी गेले असता त्याठिकाणी अंधार होता. त्यामुळे मोबाईलचा आधार घेत अनेकांनी जडअंत:करणाने गणेशमूर्तींना निरोप दिला. सार्वजनिक गणेशमूर्ती कपिलेश्वरच्या नवीन व जुन्या तलावामध्ये विसर्जन केल्या जातात. त्याची तयारी महानगरपालिकेने यापूर्वीच केली आहे. मात्र दीड दिवस व पाच दिवसांचे घरगुती गणेशमूर्तीही या ठिकाणी काहीजण विसर्जन करतात. त्यांची सोय करण्याचा विसर मनपाला झाल्याचे दिसून आले. याबाबत तक्रार करताच तातडीने महानगरपालिकेने लाईटची सोय केली.









