पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या ३० एप्रिल रोजी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असल्याचे समोर आले. मात्र, या चॅनलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा आणि हॅकरकडे प्रश्नपत्रिका असल्याचा दावा धादांत खोटा आहे, अशा प्रकारे कोणताही डेटा किंवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही, असा खुलासा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या ३० एप्रिल रोजी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यापैकी बाह्यलिंकवर उपलब्ध असलेली प्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.
टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध झालेली प्रवेश पत्र वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याबाबतची खात्री तज्ञांकडून करण्यात आले आहे, असे आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करून घेतलेल्या प्रवेश पत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
प्रवेशपत्र लीक करणाऱ्या चॅनलच्या एडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे, असे या प्रसिद्धी पत्रकारद्वारे उमेदवारांना आश्वस्त केले जात असल्याचे आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले.







