गोवा पोलिसांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांचे ‘हॅकथॉन’ : गोवा पोलिसांचा फर्मागुडी फोंडा येथे नॉनस्टॉप 48 तास हॅकथॉन उपक्रम,10 महाविद्यालयातून 53 विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रतिनिधी /फोंडा
तंत्रज्ञानावर भरवसा वाढल्याने सायबर गुन्ह्यात मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे केवळ पोलिसांना गुन्हा घडल्यानंतर तपासाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरणारे साधन ठरत आहे. आजच्या टेक्नोसेव्ही युगात वावरताना गुन्हा घडतानाच यंत्रणा सतर्क कशी होणार तसेच विद्यार्थीदशेतील विद्यार्थ्याचे सुप्त गुण हेरून सायबर गून्हे कमी करण्यासंबंधी प्रणाली ‘हॅकाथॉन’ च्या माध्यमातून उभारणे काळाजी गरज बनल्याची माहिती गोवा पोलिसचे महासंचालक जसपाल सिंग यांनी दिली.
फर्मागुडी-फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यायलाच्या संकुलात काल रविवारी 48 तासांच्या ‘हॅकथॉन’ या महाविद्यालयीन विद्यार्थी व गोवा पोलीस प्रेन्डली उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्याच्यासमवेत पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग, पोलीस अधिक्षक अभिषेक धानीया, सायबर क्राईम अधिक्षक निधीन वालसन, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश बी. लोहानी, आयआयटीचे संचालक प्रा. बी. के. मिश्रा व प्रा. सिन्हा उपस्थित होते. गोव्यातील नागरिकांना अधिक कार्यक्षमतेने सेवा देण्यासाठी तांत्रिक व कोडींग कौशल्याने उपाय शोधण्यासाठी विद्यार्थी नॉनस्टॉप 48 तास संगणकावर कोडींग करीत आहेत. गोवा पोलिसांकडून पहिल्यांदाच आयोजित केलेल्या हॅकथॉन काल 10 सप्टे. रोजी सुरू झाली असून आज 12 सप्टे. दुपारी 2 वा. पारितोषिक वितरणाने या उपक्रमाची सांगता होणार आहे.
10 महाविद्यालयातून 53 तांत्रिकदृष्या सक्षम विद्यार्थ्यांची निवड
या उपक्रमात राज्यभरातील 10 महाविद्यलयातून तांत्रिकदृष्टया सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांची हॅकथॉनसाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये शिरोडा येथील रायेश्वर इंजिनियरिंग ऍन्ड इर्न्फोमेशन टेक्नोलोजी, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, गोवा विद्यापीठ, फातोर्डा येथील डॉन बॉस्को इंजिनियरिंग, बिटस् पिलानी गोवा, पाद्रे कोन्सोसाव अभियांत्रिकी महाविद्यालय, जीव्हीएम वाणिज्य महाविद्यालय, एनआयटी गोवा, खुली विद्यापीठातील व नावेली येथील विविधा अशा दहा संस्थातील 53 विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती. गोवा पोलिसांना विविध सायबर गुन्हयात शोध लावताना येणाऱया अडचणी व भेडसावणारे जटील प्रश्नासंबंधी 7 विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक बुद्धिमत्तेवर व चोरांच्या मानसिनकतेचा विचार करून नॉनस्टॉप 48 तास संगणकावर काम करीत उपाय काढणे असे कठिण काम विद्यार्थ्यांना तडीस न्यावे लागणार आहे. गुन्हेगाराच्या चेहऱयाची ओळख, स्वयंचलित अपघात अलर्ट प्रणाली, मालवेअर विश्लेषण आणि तपास, असुरक्षा मुल्यांकन नैतिक हॅकिंग, गडद आणि सोशल मिडीया देखरेखेसाठी ओएसआयएनटी तसेच ऑपन एन्डेड समस्या असे जटील विषय विद्यार्थ्याना हा उपक्रमात हाताळावे लागणार आहेत.
सायबर गुन्हय़ावर नियंत्रण मिळविण्य़ासाठी युवकांना प्रोत्साहन
गोवा पोलीस आणि विद्यार्थी यांच्यातील भागीदारीमुळे नाविन्यपुर्ण विचारसरपणीचे तांत्रिक ज्ञान आणि उत्साहाने डिजिटल तोडगा काढणे हा उद्देश आहे. हॅकाथॉनात विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित केलेले आहे. हॅकाथॉन उपक्रमात सहभाग झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रथम रू. 25 हजार, द्वितीय 15 हजार, तृतीय 10 हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगारासाठीही हे प्रशस्तीपत्र उपयुक्त ठरणार आहेत. नोंदणीकृत विद्यार्थ्यांना इतर राज्यातही हॅकाथॉन सहभाग दर्शविण्याची मुभा असल्याची माहिती जपसाल सिंग यांनी दिली. पणजी स्मार्ट सिटीसाठी सर्व आयपी प्रणालीयुक्त सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेरे नेटवर्कच्या माध्यमातून जोडणार असल्याची माहिती त्यानी दिली. यापुढे भविष्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हॅकथॉनसारखे उपक्रम राबविण्यात येईल असे शेवटी सांगितले.









