डोप चाचणीचा निकाल सकारात्मक आल्याचा परिणाम, हंगामी बंदी 10 जुलैपर्यंत कायम राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जिम्नॅस्टिकपटू दीपा करमरकरवर ‘इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने 21 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली असून सदर संस्था आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघासाठी डोपिंगसंदर्भातील चाचणी प्रक्रिया हाताळते. मात्र ही बंदी मागील काळापासून लागू होणार असून त्यामुळे 10 जुलै, 2023 पर्यंत कायम राहणार आहे.
दीपाची ‘हायजेनामाइन’साठी चाचणी सकारात्मक आली आहे. त्याचे स्पर्धेवेळी आणि स्पर्धेबाहेर हा सेवन करण्यास मनाई आहे. दीपाचे नमुने 11 ऑक्टोबर, 2021 रोजी स्पर्धेत सहभागी झालेली नसताना गोळा करण्यात आले होती. अमेरिकेच्या अँटी-डोपिंग एजन्सीनुसार, ‘हायजेनामाइन’ सामान्य उत्तेजक म्हणून कार्य करू शकते. 2017 पासून ते त्यांच्या प्रतिबंधित पदार्थांच्या यादीमध्ये जोडले गेले आहे.

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपा प्रोड्युनोव्हा व्हॉल्टद्वारे चौथे स्थान मिळवून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी ती पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. त्यापूर्वी 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्यपदक जिंकून तशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली होती. बाकू येथील एफआयजी विश्वचषक स्पर्धा ही तिची शेवटची स्पर्धा राहिली होती. तिथे तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण बॅलन्स्ड बीम गटात पहिल्या आठ खेळाडूंत स्थान मिळवण्यात ती अपयशी ठरली होती.
यादरम्यान, 2017 मध्ये तिच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. 2018 मधील एशियाडच्या वेळी ही दुखापत चिघळली, ज्यामुळे दीपाला जकार्ता येथे अंतिम फेरीतून बाहेर पडावे लागले. टोकियो ऑलिम्पिक हुकण्यापूर्वी पुढच्या वषी तिला आशियाई आणि जागतिक स्पर्धेत दुखापत आणि कोविडमुळे सहभागी होता आले नाही.
21 महिन्यांच्या बंदीमुळे या 29-वषीय जिमनॅस्टला अ?परेटस विश्वचषक मालिकेतील चारही स्पर्धा आणि सहा वर्ल्ड चॅलेंज कप मालिकेतील किमान तीन स्पर्धांना मुकावे लागणार आहे. यंदा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर यादरम्यान एंटवर्पमध्ये होणार असलेल्या जागतिक स्पर्धेतून ती तिचा चार वर्षांचा वनवास संपवू शकेल. ती ऑलिम्पिकसाठीची पात्रता स्पर्धा असेल.









