बेळगाव मुख्य पोस्ट खात्यात सुविधा : पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : सर्वसामान्य जनतेला शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी पोस्ट खात्यामार्फत ज्ञान पोस्ट ही नवीन सर्व्हिस कार्यान्वित करण्यात आली आहे. याअंतर्गत सर्व पुस्तके सवलतीच्या दरात पाठवता येणार आहेत. अशी माहिती बेळगाव पोस्ट कार्यालयाचे सुपिरीटेंड विजय वडोणी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामीण आणि अति दुर्गम भागात पाठ्यापुस्तके व सर्व प्रकारची पुस्तके पोहोचावीत आणि शिक्षणातील दरी कमी व्हावी, हा पोस्ट खात्याचा उद्देश आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचावे, यादृष्टीने केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये 300 ग्रॅमपर्यंतच्या पॅकेटसाठी 20 तर 5 किलो वजनापर्यंतच्या पुस्तकासाठी 100 रुपये माफक दरात सेवा पुरविली जाणार आहे.
विद्यार्थी, शिक्षक, लेखक, शाळा व शैक्षणिक संस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयासह बैलहोंगल आणि रामदुर्ग मुख्य पोस्ट कार्यालयात ही सुविधा उपलब्ध आहे. पार्सल सेवेपेक्षा ही सेवा माफक दरात दिली जाणार आहेत. शिवाय यासाठी ऑनलाईन टेकिंग सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे आता देशात कुठे ही सवलतीच्या दरात पुस्तके पाठवता येणार आहेत. 1 मे पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गोर-गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांची देवाण-घेवाण करणे ही सोयीस्कर होणार आहे. आज अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जात आहेत अशा विद्यार्थ्यांना ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. तसेच अनेक लेखक, साहित्यिक आणि वाचकांना दिलासा मिळाला आहे.









