शेतकरी हतबल : बेकिनकेरेत गव्यांचा धुमाकूळ : भात पिकाचे नुकसान, वनखाते सुस्त
बेळगाव : बेकिनकेरे येथील भात शेतीत गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घालून नुकसान केले आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या नारायण किटवाडकर यांच्या भात शेतीचे नुकसान झाले आहे. दरवर्षी पिकांचे नुकसान होत असले तरी वनखाते मात्र उदासिन असल्याचे दिसत आहे. गव्यांच्या नुकसानीने शेतकरी मात्र हतबल झाले आहेत. ‘गवे पिकाला वर येऊ देईनात, अन् वनखाते सुस्त’ अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासन आपल्याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवालही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडीसह चंदगड तालुक्यातील सुंडी, कौलगे, होसूर आदी ठिकाणी गव्यांचा वावर वाढला आहे. डेंगरपायथ्याशी असलेल्या शिवारात धुडगूस सुरू आहे. त्यामुळे भात, ऊस, भुईमूग, बटाटा, रताळी, मका, आदी पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. विशेषत: कोवळ्या असलेल्या भात पिकांत गव्यांनी धुमाकूळ घालून मोठे नुकसान केले आहे. रात्रीच्यावेळी गव्यांचा कळप आल्याने भातपीक पायाखाली गेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी चिंतातूर बनले आहेत. डोंगर परिसरात खायला कायच मिळत नसल्याने गवे शिवारात उतरू लागले आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी कित्येकवेळा तक्रारी करूनदेखील वनखात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नुकसान होऊन शिल्लक राहिलेले पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे.
कोवळ्या पिकात गव्यांचा हैदोस
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भात, बटाटा, रताळी आणि भुईमूगची पेरणी केली आहे. यंदा पाऊस उशिराने दाखल झाल्याने पिकांची उगवणदेखील उशिराने झाली आहे. मात्र या कोवळ्या पिकात गव्याचा कळप हैदोस घालत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. याबाबत वनखात्याकडे तक्रार केली असता. शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन माघारी पाठविले जात आहे. त्यामुळे आम्ही कोणाकडे पहावे, असा प्रश्नदेखील शेतकऱ्यांसमोर पडू लागला आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात गवे येऊ नयेत, यासाठी चर काढण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गवेरेडे थेट शेतात येऊ लागले आहेत. शिवाय पिकांचेदेखील नुकसान होऊ लागले आहे. वनखात्याने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









