प्रतिनिधी / नागठाणे :
ग्वाल्हेर-बेंगळूर आशियाई महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले आहेत. नितीन धर्मराज जाधव (वय.27, रा.आनेवाडी, ता.सातारा) असे अपघातातील मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रामकृष्णनगर (ता.सातारा) येथे ट्रक व दुचाकी यांच्यात अपघात झाला. साताराहून कराड बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर रामकृष्णनगर येथे उड्डाणपुलावर ट्रक नादुरुस्त झाल्याने जागेवर उभा होता.यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीचालकाला अंदाज न आल्याने दुचाकी जोरात ट्रकवर जाऊन आदळली.या अपघातात दुचाकीवरील चंद्रकांत शंकर फरांदे (वय.35) व नितीन धर्मराज जाधव (वय.27,दोघे रा.आनेवाडी,ता.सातारा) हे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी तात्काळ सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी नितीन धर्मराज जाधव या युवकाचा मृत्यू झाला.
दुसऱ्या अपघातात अतीत (ता.सातारा) येथे पुढे चाललेल्या कंटेनर ट्रकला भरधाव वेगाने निघालेल्या मारुती स्विफ्ट कारने पाठीमागून जोरात धडक दिल्याने कारमधील चौघेजण जखमी झाले. महेंद्रकुमार आमीन,पुष्पाबेन पटेल,बबनदास पटेल व पार्वतीबेन पटेल अशी कारमधील जखमींची नावे आहेत.त्यांना उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नागठाणे(ता.सातारा) येथे भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो उरमोडी नदीच्या पुलावरील भरावावरून खाली कोसळला.मंगळवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील दोघे (नाव व गाव समजू शकले नाही) जखमी झाले. या अपघातांची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे हवालदार विजय देसाई व उत्तम गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तीनही अपघातांची नोंद करण्याचे काम सुरू होते.









