झाडलोड करणारी व्यवस्थाच कोलमडली ; एसटी कर्मचारी विश्रामगृह, कर्मचारी कार्यालयामध्ये अस्वच्छता
प्रतिनिधी/ सातारा
सातारा आगारामध्ये गेले काही दिवसांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य तयार झाले आहे. पूर्वी महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी असायचे. ते नियमित स्वच्छता करायचे. परंतु आता खाजगी ठेकेदारांमार्फत हे काम केले जाते. गेल्या तीन ते चार महिन्यापासून स्वच्छतेची पूर्णपणे व्यवस्था कोलमडली आहे. अगदी सगळीकडे कचराकुंडी झालेली आहे. त्यातच गटर उघडय़ावर वाहत आहे. तसेच एसटी कर्मचाऱयांचे विश्रामगृह, कर्मचारी कार्यालय यामध्येही अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे तेथील आरोग्य कर्मचारी आणि प्रवाशी यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
सातारा आगार हे जिह्याचे आगार आहे. याच आगाराप्रमाणे इतर आगारामध्येही स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहेत. मात्र, सातारा आगारात अगदी दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारापासून अस्वच्छतेचे साम्राज्य पहायला मिळते आहे. पुणे स्वारगेट, मुंबई जाणाऱया बुकींग, सातारा वाई बुकींग येथेही कर्मचारी तसेच काम करत असतात. तर प्रवाशी रांगेत उभे राहून तिकीट घेत असतात. त्या दरम्यान, अस्वच्छतेमुळे डासांमुळे आरोग्याचा प्रश्न आहे. फलाट क्रमांक 1 ते 8 च्या बाजूला गटर उघडय़ावरुन वाहत आहे. त्यातच पुढे कचऱयाच्या ढिगात ते गटर वाहत जात आहे. कोपरेही अस्वच्छतेच्या कचरा कुंडय़ा झालेल्या आहेत. कर्मचाऱयांचे असलेले रेस्ट हाऊस अस्वच्छतेचे आगार बनले आहे. पूर्वी महामंडळाचे कर्मचारी हे स्वच्छता करत असायचे आता खाजगी ठेकेदाराकडून हे काम करण्यात येते. परंतु गेल्या तीन ते चार महिन्यापासून अतिशय खराब अशी परिस्थिती आहे. याकडे पहायला सुद्धा वेळ नाही प्रशासनाला त्यामुळे हे चित्र बदलणार केव्हा असा प्रश्न उपस्थित होत आहे.








