कारापूरचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, आमदार प्रेमेंद्र शेट यांचा पाठपुरावा
डिचोली : डिचोली ते साखळी या मुख्य रस्त्याला लागून विठ्ठलापूर सांखळी येथे असलेले गटर सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे उपसण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील लोकांनी तसेच वाहन चालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याला लागून गटर अस्तित्वात आहे, याची जणीव काल पाण्याला वाट करण्यासाठी केलेल्या खोदकामानंतर झाली. कारापूर सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी या कामासाठी गेले पंधरा दिवस सतत प्रभावीपणे पाठपुरावा केल्यानंतर या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली. याकामी त्यांना मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही मोलाचे सहकार्य केले. एक दोन दिवसांमध्ये या गटरातील संपूर्ण माती उपसून ते पावसाळी पाण्यासाठी सुरळीत करण्यात येणार आहे. त्यामुळे यावषी पावसाचे पाणी व माती रस्त्यावर येणार नाही. असे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी सांगितले. दरवषी पावसाळ्यात विठ्ठलापूर सांखळी भागातील मुख्य रस्त्याला लागून असलेली गटरे उपसण्यात येत नसल्याने तसेच पाण्याला रस्त्याच्या बाजूला योग्य वाट करून देत नसल्याने पाऊस पडल्यानंतर पाणी रस्त्यावर येत होते. या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात माती दगड रस्त्यावर वाहून येत असल्याने त्याचा वाहन चालकांना त्रास होत होता. काही दुचाकीस्वार या मातीवर घसरून पडल्याच्याही अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तसेच या माती दगडामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन मोठमोठे ख•s पडत होते. या संदर्भात दै. तरूण भारतने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन सरपंच खारकांडे यांनी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या मदतीने सा. बा. खात्याच्या रस्ता विभागाचे अभियंता यांच्याशी सतत पाठपुरावा करून या कामाला लगेच प्रारंभ केला.
खोदकाम करताना सापडले गट
गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या बाजूने वाहणारे पावसाचे पाणी योग्य वाट नसल्याने बाहेर येऊन रस्त्यावरून वाहत होते. या भागात केवळ माती आणि दगडच भरलेले होते. सा. बां. खात्यातर्फे या भागातील माती उपसून पाण्याला वाट करण्यात येत असताना या मातीखाली असलेल्या गटराच्या अस्तित्वाची जाणीव झाली. मातीच्या खाली अदृष्य झालेले हे गटर आता पूर्णपणे साफ करण्यात येणार आहे. हे गटर या भागात आहे याची कल्पना आपणासही नव्हती, असे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी सांगितले.
बऱ्याच वर्षांनंतर गटराची साफसफाई 
गेल्या 1991 सालापासून आम्ही पाहतोय या गटरातील पाणी हे पावसाळ्यात कायम रस्त्यावरूनच वाहत होते. यावषी मात्र सरपंचांनी स्वत: लक्ष घालून हे काम हाती घेतल्याने लोकांना समस्या जाणवणार नाही. सरपंच व आमदारांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, अशी प्रतिक्रिया येथील एक स्थानिक व्यास जावडेकर यांनी व्यक्त केली.
गटराच्या कामामुळे लोकांमध्ये समाधान 
आपल्या प्रभागातील गटरांची साफसफाई करताना याही गटराची थोडीफार साफसफाई आपण केली होती. परंतु सा.बां. खात्याकडून या गटराचे काम हाती घेण्यात आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. अशाचप्रकारे दरवषी या गटराची साफसफाई खात्याकडून करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक पंचसदस्य ज्ञानेश्वर बाले यांनी केली आहे.









