उद्यापर्यंत जुना पूल खुला करण्याचे प्रयत्न
वार्ताहर /केपे
होडर, कुडचडे येथे नवीन पुलाचे काम सुरू असून स्थानिक आमदार असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्याकडून त्याची सोमवारी पाहणी करण्यात आली. सध्या ‘गडर’ बसविण्याचे हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची वेळ दिली असली, तरी त्याच्यापूर्वीच काम पूर्ण होईल. त्यानंतर येथील जुना पूल जनतेकरिता पुन्हा खुला केला जाईल, असे काब्राल यानी सागितले. 250 टनांच्या दोन क्रेन आणल्या असून त्यांच्या मदतीने सुमारे 100 टनांचा गडर सोमवारी बसवला जाईल. त्यानंतर दुसराही बसवला जाईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारपर्यंत जुना पूल खुला केला जाईल. हे काम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड झाल्याने ताबडतोब बेळगावमधे जाऊन दुरुस्ती करून घेऊन कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारच्या जागी बुधवारपर्यंत जुना पूल खुला करण्याचा प्रयत्न करू, असे काब्राल यांनी कामाचा आढावा घेतल्यानंतर स्पष्ट केले.









