तासगाव :
तासगांव गावचे हद्दीत विनापरवाना बेकायदा गुटखा वाहतुक प्रकरणी तासगांव पोलीसांनी कारवाई केली. सुमारे पावणे दोन लाख रूपयांचा गुटखा व पाच लाख किमतीची चारचाकी असा एकूण ६ लाख ७४ हजार ९४४ रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. गेल्या चार दिवसातील गुटख्याची ही दुसरी कारवाई आहे. याप्रकरणी तासगांव पोलीस ठाणेतील हेड कॉन्स्टेबल अरविंद सपकाळ यांनी चारचाकी चालक विकास वसंत जाधव (रा. कोडोली, जि. सातारा) यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तासगांव नजीक जुना सातारा रोड लांडघोलमळा या ठिकाणी झालेल्या अपघाताची चौकशी करणेसाठी फिर्यादी व इतर पोलीस रवाना झाले. दुचाकी व चारचाकी 100 0152 वाहनाचा अपघात झाल्याची पोलीसांची खात्री झाली.
यावेळी अपघातातील चारचाकी (एम.एच.११ डीडी ०१५२) चे चालक विकास जाधव याचे ताब्यातील गाडीतील मालाबाबत पोलीसांनी चौकशी केली. यावेळी चारचाकीमध्ये सुगंधी तंबाखु असलेबाबत सांगितले. इतर पोलीसांना बोलवुन रात्रीची वेळ असल्याने शासकीय पंच उपलब्ध होत नसल्याने वाहनाची पाठीमागील बाजु ताडपदरीने बंद करून त्यावर दोरीने बांधले. हे वाहन सुरक्षिततेकरिता तासगांव पोलीस ठाणेत आणून लावले.
अपघाताचे चौकशी कामी विकास जाधव यांना पोलीस ठाणेत थांबणेबाबतची समज दिली. गुरूवारी जाधव यांना दोन पंचासमक्ष मालाबाबत विचारले त्यांनी सुगंधीत तंबाखु गुटखा असलेबाबत सांगितले. या चारचाकीमध्ये झडती घेतली असता चार पोत्यामध्ये लहान चार बॅगा आढळल्या. बॅगेमध्ये ५२ पान मसाल्याचे प्लॅस्टिक पाकीट असे एकूण ८३२ पाकीटे होती. एका पाकिटाची किमंत १८७ रूपये असा १ लाख ५५ हजार ५८४ रूपयांचा हा मुद्देमाल तसेच चार पांढऱ्या रंगाची पोती त्यामध्ये प्रत्येक पोत्यात लहान १० बॅगा प्रति बॅगेमध्ये तंबाखुची प्लॅस्टिकची पाकिटे असे एकूण १९ हजार ३६० रूपयांचा हा मुद्देमाल व ५ लाख रूपयांची चारचाकी असा एकूण ६ लाख ७४ हजार ९४४ रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून वाहन चालकास ताब्यात घेतले आहे.
- अन्न औषध प्रशासन गांधारीच्या भूमिकेत
तासगांव तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून गुटखा तसेच सुगंधी तंबाखूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याची चर्चा रंगली आहे. चारच दिवसापूर्वी तासगांव परिसरातच सुमारे एक लाख रूपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखु तासगांव पोलीसांनी जप्त केली आहे. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा पावने दोन लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. तासगांव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री व सुगंधी तंबाखुचा वापर होत असल्याचे दिसून येते. अन्न व औषध प्रशासन विभागाला हे का दिसत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.








