चिपळूण :
मुंबई–गोवा महामार्गावरील कापसाळ येथे तब्बल 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो चिपळूण पोलिसांनी सापळा रचत पकडल्याची घटना गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. हा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सज्जन रामचंद्र निवेगी (35, सावंतवाडी) असे अटक केलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. गुऊवारी परजिह्यातून बोलेरो टेम्पो भरुन तब्बल 16 लाख 94 हजार किंमतीचा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे आदींच्या पथकाने मुंबई–गोवा महामार्गावर कापसाळ येथे सापळा रचला. यावेळी महामार्गावरुन आलेला बोलेरो टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याने भरलेली मोठ–मोठी पोती असल्याचे आढळले. त्यात 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या गुटख्याचा समावेश आहे. या प्रकरणी सज्जन निवेगी याला पोलिसांनी अटक केली. तसेच गुटख्यासह 7 लाखाचा टेम्पो असा 23 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सज्जन निवेगी याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे पानटपरीवर बिनधास्तपणे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परजिह्यातून आणलेला हा गुटखा चिपळुणात नेमका कोणाला दिला जाणार होता, शिवाय यामागे अन्य कोणाचा समावेश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.








