अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई, रत्नागिरी पथकाची धडक कारवाई : शहरात दोन ठिकाणी मारले छापे : व्यावसायिकांचे धाबे दणाणले
प्रतिनिधी/चिपळूण
अन्न आणि औषध प्रशासनाच्या मुंबई व रत्नागिरी येथील पथकाने गुरूवारी शहरातील दोन ठिकाणी छापे मारले. यात सुमारे 10 लाख रूपयांचा गुटखा जप्त केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या मोठ्या कारवाईमुळे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या बाबत गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या अनेक वर्षापासून बेकायदा गुटखा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी रंगोबा साबळे रोडवरील एका इमारतीत छापा मारून लाखो रूपयांचा माल जप्त करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित मालकाने आपला व्यवसाय अन्य ठिकाणी हलवला होता. असे असताना त्याने पुन्हा त्याच जागी, तर अन्य एका व्यावसायिकाने पानगल्ली परिसरातील एका इमारतीत व्यवसाय सुरू केल्याची माहिती वरील विभागाच्या मुंबई व रत्नागिरीतील पथकांना समजली होती.
हे ही वाचा : चिपळुणातील दोन अपघातात महिला ठार, ४ जखमी
त्यानुसार गुरूवारी एकाचवेळी दोन्ही ठिकाणी छापे मारण्यात आले. यावेळी सुमारे 10 लाख रूपयांचा माल मिळाल्याचे वृत्त आहे. मात्र कारवाई करताना त्यांच्या नातेवाईकांसह काही राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर सायंकाळी कारवाईचा वेग वाढवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.