येरमाळा पोलिसांचा मोठा सापळा; लाखोंचा गुटखा रिक्षातून जप्त
येरमाळा : येरमाळा पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास तेरखेडा येथून जवळच असलेल्या कडकनाथवाडी रस्त्यावरील रिक्षामध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळल्याने एकास ताब्यात घेतले आहे.
येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि तात्या भालेराव यांना पोलिसांच्या गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अॅपे रिक्षामधून लाखो रुपयांचा गुटखा घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले होते. यावरून सपोनि तात्या भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे वेगाने फिरवत येरमाळा पोलीस ठाण्याचे पोउनि स्वप्निल भोजगुडे, अमोल जाधव यांच्यासह पथकाने आपली सतर्कता दाखवत वाहनाची तेरखेडा येथून जवळच असलेल्या कडकनाथवाडी रस्त्यावर उभा असलेला पिवळ्या रंगाचा अपे रिक्षाची (एमएच २४–एबी ६५८१) तपासणी केली असता गुटखा आढळून आला.
हे वाहन मालासह पोलीस ठाण्यामध्ये आणले असता मोहीन नजीर पटवेकर (वय २९, रा. आदर्श नगर, वाशी, ता. वाशी) याच्याविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे करीत आहेत.








