पंढरपूर पोलिसांकडून 44 लाखांचा गुटखा जप्त
पंढरपूर प्रतिनिधी
मालवाहतूक ट्रकमधून कर्नाटक येथून टेंभुर्णीकडे गुटखा घेऊन जाणाऱया वाहनावर पंढरपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील अहिल्यादेवी पुलाजवळ झाली आहे. यामध्ये मालवाहतूक ट्रकसह 44 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रकचालकास अटक करण्यात आली असून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून सांगोला मार्गाने पंढरपूर शहरातील अहिल्या पुलाजवळील रस्त्यावरून मालट्रकमध्ये गुटखा जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अहिल्या पुलाजवळ सापळा रचून मालट्रकची (एमएच 09-meerS 3630) तपासणी करण्यात आली. यामध्ये हिरा कंपनीचा पान मसाला 120 पोती (किंमत 27 लाख 60 हजार रुपये), रॉयल 717 कंपनीच्या तंबाखूची 30 पोती (किंमत सहा लाख 90 हजार रुपये) तर अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (किंमत 10 लाख रुपये) असा एकूण 44 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रकचालक प्रकाश रेवाप्पा शेजाळे (वय 21, रा. भीमा तेलगाव, ता. दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर) यास अटक करण्यात आली आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला कळविले असून पुढील कारवाई सुरू आहे.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सी. व्ही. केंद्रे, पोसई दत्तात्रय आसबे, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकॉ ढेरे, पोहेकॉ सुरज हेंबाडे, पोहेकॉ शरद कदम, पोना सचिन इंगळे, पोना सुनील बनसोडे, पोना दादा माने, पोना राकेश लोहार, पोना सचिन हेंबाडे, पोना सुजित जाधव, पोकॉ समाधान माने यांनी केली आहे.