देवरुख :
गुटखामाफीयांना देवरुख पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री दणका दिला. मध्यरात्री तब्बल 20 किलोमीटर थरारक पाठलाग करून 4 लाख 41 हजार 50 रुपयांचा गुटख्यासह गुटखा विक्रीसाठी वापरण्यात आलेल्या 5 लाखाच्या कारसह एकूण 9 लाख 41 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल देवरुख पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चौघाजणांना अटक करण्यात आली असून यात एका महिलेचाही समावेश आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत साळुंखे यांनी फिर्याद दिली. मुबीन अश्रफ मेमन (19), तायरा अश्रफ मेमन (50), अश्रफ हाजी दाऊद मेमन (52, तिघेही रा. रत्नागिरी मच्छीमार्केट झारणी रोड), अब्बास इरफान जुन्नानी (20, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे हे सोमवारी मध्यरात्री गस्त घालत होते. पेट्रोलिंग करत असताना तिवरेतर्फे मेढे येथे कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची तवेरा कार संशयास्पद आढळून आली. पोलीस पथक चौकशीसाठी येत असल्याचे कळताच तवेरा चालकाने पळ काढत कार वेगाने पळवली.
पोलीस निरीक्षक झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारचा थरारक पाठलाग करण्यात आला. कार रत्नागिरीच्या दिशेने धावत असल्याचे पाहताच याबाबतची खबर हातखंबा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी हातखंबा तिठा येथे थेट वाहने रस्त्यात लावून नाकाबंदी केली अन् हा सापळा अखेर यशस्वी झाला. हातखंबा येथे कार (एमएच 08, आर 8295) देवरुख पोलिसांनी ताब्यात घेतली. तपासणीदरम्यान कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पानमसाला व सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ विमल व आरएमडी कंपनीचा 4 लाख 41 हजार 50 रुपयांचा गुटखा सापडला. गुटखा व 5 लाख किंमतीची कार असा एकूण 9 लाख 41 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल देवरूख पोलिसांनी जप्त केला.
मुबीन मेमन, तायरा मेमन, अश्रफ मेमन, अब्बास जुन्नानी यांच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करत आहेत. या कारवाईबद्दल देवरुख व हातखंबा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.








