आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून उघड : दरवषी सुमारे 10 लाख लोक तंबाखूमुळे मृत्युमुखी
प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकात पुरुषांच्या गुटखा खाण्याच्या टक्केवारीत वाढ झाली असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. तंबाखू सेवन टक्केवारीमध्ये घट दिसून आली असली तरी गुटखा खाण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे. या विभागाने केलेल्या चौथ्या सर्वेक्षणामध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण 34.3 टक्के होते, ते आता पाचव्या सर्वेक्षणामध्ये 27.3 टक्क्यांवर आले आहे. मात्र, गुटखा आणि पानमसाला खाण्याच्या टक्केवारीत 9.6 वरुन 10.4 टक्के वाढ झाली आहे.
24 तासांमध्ये 5 पेक्षा कमी सिगारेट ओढणाऱयांमध्ये ग्रामीण भागातील 74.2 टक्के पुरुष व शहरी भागातील 63.3 टक्के पुरुष आहेत. 1.4 टक्के स्त्रिया पानमसाला किंवा गुटख्याचे सेवन करतात. यामध्ये शहरी स्त्रियांचे प्रमाण 1.6 टक्के आहे. 15 ते 49 वयोगटातील 14.5 टक्के पुरुषांना पानमसाला व गुटखा खाण्याचे व्यसन आहे.
तंबाखूच्या व्यसनातून बाहेर येणे कठीण
कर्नाटक राज्य तंबाखू नियंत्रण मंडळाच्या उच्चाधिकार समितीचे सदस्य डॉ. विशाल राव यांच्या मते एकदा का तंबाखूचे व्यसन जडले की, त्यातून बाहेर येणे कठीण होते. भारतात अशा व्यसनांमधून सुटका करुन घेण्यात यशस्वी होणाऱयांचे प्रमाण केवळ 6 टक्के आहे.
30-40 वयोगटात कॅन्सरचा धोका
चिंताजनक बाब म्हणजे 18 वर्षाखालील 30 टक्के युवकांना तंबाखूचे व्यसन जडले आहे. त्यामुळे 30 ते 40 वयोगटात कॅन्सरचा धोका दिसून येत आहे. पूर्वी हा धोका 60 वर्षांवरील लोकांमध्ये दिसून येत होता. गुटखा खाण्याचे प्रमाण उत्तर भारतीय राज्यांमध्ये अधिक आहे. दरवषी सुमारे 10 लाख लोक तंबाखूमुळे झालेल्या रोगांमुळे मृत्युमुखी पडत आहेत. भारतात धुम्रपान न करणाऱयांचे आरोग्य राखण्यासाठी व तंबाखू उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2003 मध्ये कायदा संमत झाला आहे. परंतु त्याच्या अंमलबजावणीचे प्रमाण नगण्य आहे. या पार्श्वभूमीवर तंबाखू व तत्सम उत्पादनांच्या विक्रीसाठी विक्री परवाना सक्तीचा करावा, अशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. जानेवारी 2021 मध्ये सरकारने कर्नाटक म्युनिसिपालिटीचा मसुदा अधिसूचित केला. वास्तविक हा प्रस्ताव 2013 मध्येही मांडला गेला होता. आता त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. परंतु, तंबाखू उत्पादक व उद्योजकांकडून हा प्रस्ताव लांबणीवर टाकावा, यासाठी दबाव येत आहे.









