स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकजण ताब्यात
प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, आरएमडी व विमल पान मसाला, व्ही-1 तंबाखु (गुटखा) असा एकूण 4 लाख 95 हजार 570 रूपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. याप्रकरणी गणेश बबनराव यादव (वय 39, रा. पालवी चौक गोडोली) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना एक इसमाने गोडोली येथील भैरोबा चौक मंदिराशेजारी असणारे विराज किराणा स्टोअर्सच्या पाठीमागे गुटख्याचा साठा केलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन छापा टाकला. यावेळी आर.एम.डी. पान मसाला, विमल पानमसाला व व्ही-1 टॉबॅको (तंबाखु), हिरा पान मसाला असा एकूण 4 लाख 95 हजार 570 रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यांची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी रोहन राजेंद्र कुमार शहा यांना दिल्यानंतर हा मुद्देमाल त्यांनी ताब्यात घेतला.
या कारवाईत पोलीस हवालदार संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, पोलीस नाईक मुनीर मुल्ला, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्टेबल मोहसीन मोमीन, वैभव सावंत यांनी सहभाग घेतला.








