युद्धपीडित देशात बदल घडवून आणणार
वृत्तसंस्था/ बोगोटा
कोलंबियातील डावे नेते गुस्तावो पेट्रो यांनी रविवारी अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. विषमतेशी लढण्याचे आणि सरकार तसेच बंडखोरांदरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धाने पीडित देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याचे आश्वासन पेट्रो यांनी दिले आहे. कोलंबियाच्या एम-19 गोरिल्ला समुहाचे माजी सदस्य असलेल्या पेट्रो यांनी पारंपरिक पक्षांना पराभूत करत जून महिन्यात निवडणूक जिंकली होती.
देशातील मतदार हे डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना समर्थन करत नव्हते. या पार्श्वभूमीवर पेट्रो यांचा विजय कोलंबियासाठी असाधारण मानला जातोय. डाव्या नेत्यांवर गुन्हेगारीबद्दल नरमाईची भूमिका किंवा गोरिल्ला समुहांबद्दल सहानुभूती बाळगण्याचा आरोप केला जातो.
कोलंबियाचे सरकार आणि सशस्त्र गटांदरम्यान 2016 मध्ये झालेल्या शांतता करारानंतर मतदारांचे लक्ष हिंसक संघर्षापासून हटवत दारिद्रय़ तसेच भ्रष्टाचार यासारख्या समस्यांवर केंद्रीत झाले आहे. 62 वर्षीय पेट्रो यांनी दारिद्रय़ निर्मुलन कार्यक्रमांवर खर्च तसेच ग्रामीण भागांमधील गुंतवणूक वाढवून कोलंबियातील सामाजिक तसेच आर्थिक विषमता दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. सोन्याच्या खाणी तसेच अन्य साधनसंपत्तीबद्दल लढत असलेल्या उर्वरित सशस्त्र गटांसोबत शांतता चर्चा करू इच्छित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









