विद्यार्थ्यांकडून विविध गाण्यांचे सादरीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
येथील स्वरगंध संगीत विद्यालयातर्फे रविवारी शहापूर, कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयात गुरुवंदना कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर काकडे, भाग्यश्री कुलकर्णी, जितेंद्र साबण्णावर, बळवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. यावेळी किशोर काकडे यांनी प्रत्येकाच्या जीवनातील संगीताचे महत्त्व विशद केले. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात आपली संस्कृती, कृषी परंपरा आणि गुरुकुल पद्धती टिकून असल्याचे सांगितले. अंगाईगीत हे आपल्या जीवनातील पहिले संगीत असून गाणे गाणारा माणूसच सुखी आणि आनंदी राहू शकतो, असे सांगितले.
यावेळी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाला चालना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी बालगीत, हिंदी सिनेगीत, कन्नड सिनेगीत, भावगीत, भक्तिगीत, भजने सादर केली. तबल्यावर जितेंद्र साबण्णावर, संवादिनीवर भाग्यश्री कुलकर्णी, कॅसिओ साथ भक्ती धोंगडी यांनी साथ दिली. याप्रसंगी विद्यार्थी, पालक, रसिक श्रोते उपस्थित होते.









