अध्याय एकोणतिसावा
उद्धवाला भगवंतांनी मुक्ती देऊ केली होती परंतु ती नाकारत तो भगवंतांना म्हणाला, तुम्ही मला मूर्ख म्हणा, गाढव म्हणा पण मुक्तीमुळे सद्गुरुभजन थांबणार असेल, तर माझ्या दृष्टीने ते सगळ्यात मोठे विघ्न होय. हं आता तुम्ही अशी काही युक्ती सांगत असाल की, ज्यामुळे माझे मुक्तपण नित्य राहील आणि भक्तीच्या वाटेवरही मला चालता येईल तर मी तुमचा उतराई होईन. निरपेक्ष भक्ताला मुक्ती आपणहून वश होते असं तुम्हीच सांगता, त्यानुसार ती माझ्यापाशी आधीपासूनच आहे. त्यामुळे तुम्ही मुक्ती दिली, मुक्ती दिली असे वारंवार म्हणताय ना त्यात काही अर्थ नाही. तुम्ही मोठे उदार दाते आहात असे तुम्हाला दाखवून द्यायचे असेल तर माझी नित्यमुक्तता राखून मला तुमची भक्ती करता येईल अशी काही व्यवस्था करा. तुम्ही कंजूष आहात असे मी का म्हणतोय तेही मी सांगतो. तुम्ही भक्ताला मोठ्या दानशुरतेचा आव आणून जीवनमुक्ती प्रदान करता आणि त्याबदल्यात त्यांची गुरुभक्ती करायची संधी हिरावून घेता. म्हणजे हा सरळ सरळ आवळा देऊन कोहळा काढून घ्यायचा प्रकार झाला. ही बघायला गेलं तर त्यांची फसवणूकच म्हणायची. कारण गुरुभक्ती ही तुम्ही देत असलेल्या मुक्तीपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. म्हणून मला तुम्ही कंजूष वाटता. सद्गुरुभक्ती सोडून तुम्ही देत असलेली जीवनमुक्ती आम्हा भक्तांना अजिबात पसंत नाही आणि देवा तुम्ही दिलेली मुक्ती ही एक अनावश्यक गोष्ट आहे. केवळ तुम्ही प्रसन्न होऊन काहीतरी दिलंय म्हणून गोड मानून घ्यायचं एव्हढंच. मुळात तुम्ही देत असलेल्या मुक्तीची गरज कुणाला तर जो आधीपासून बांधला गेलेला आहे त्याला. जो काही हेतू मनात ठेऊन भक्ती करतो तो त्या भक्तीतून मिळणाऱ्या फळाच्या बंधनात अडकतो परंतु हरीभक्त तर कसलीही अपेक्षा न करता भक्ती करत असतो. त्यामुळे त्याला कोणतेही बंधन लागू होत नाही. तो आधीपासूनच मुक्त असतो. मग त्याला तुम्ही देऊ केलेल्या मुक्तीचा काय उपयोग? म्हणून मी म्हणतो की, जो माझ्यासारखा निरपेक्ष आहे तो मुळातूनच मुक्त असल्याने त्याला मुक्तीची मुळीच गरज नाही, त्याबदल्यात मला गुरुभक्ती करायची संधी द्या. मागे ज्यांना तुम्ही मुक्ती प्रदान केलीत ते असेच फसले आहेत. तोच प्रयोग माझ्यावर करून मलाही फशी पडू नका. मला मोक्षप्राप्तीनंतरची भक्ती हवी आहे, तेव्हढी द्या म्हणजे झाले. असे म्हणत उद्धवाने धावत जाऊन देवांना लोटांगण घालून त्यांचे दोन्ही पाय घट्ट धरले. ज्याप्रमाणे लहान मुले आपले म्हणणे मोठ्या माणसांनी मान्य करावे म्हणून त्यांच्या पायाशी गडबडा लोळण घेतात त्याप्रमाणेच उद्धवाची ही कृती होती. उद्धवाने लोटांगण घातलेले पाहून भगवंत संतुष्ट झाले आणि त्यांना त्याच्याबद्दलच्या प्रेमाचे भरते आले. मोक्षापेक्षा श्रेष्ठ असलेली गुरुभक्ती नाना युक्त्या योजून उद्धव मागत होता. आपली मागणी कशी रास्त आहे हे नाना प्रकारचे युक्तिवाद करून भगवंतांच्या गळी उतरवण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. एका श्रेष्ठ भक्ताचे हे मागणे पाहून श्रीपती अत्यंत सुखावला.
आनंदाने डोलू लागला. त्या स्वानंदस्थितीतच अतिशय संतोष पावलेल्या श्रीकृष्णनाथाने भक्तिमुक्ती उद्धवाला अर्पण केली. इतर कुणी भक्ताने असे मागणे मागितले असते तर भगवंतांनी ते सहजासहजी मान्य केले नसते पण उद्धवाची गोष्टच वेगळी होती. त्याचे पुण्य अत्यंत शुद्ध होते. त्यामुळे त्याच्यासारखा धन्य तोच होता. म्हणून भगवंतांनी त्याचे म्हणणे मान्य करून त्याला हवी असलेली मोक्षावरील गुरुभक्ती प्रदान केली. आत्तापर्यंत भगवंतांनी केलेल्या उपदेशानुसार सद्गुरू आणि ब्रह्म हे वेगवेगळे नाहीतच. त्यामुळे मोक्षावरील गुरुभजन म्हणजे एकप्रकारे ती ब्रह्मभक्ती केल्यासारखेच आहे. त्यामुळे मोक्षावरील गुरुभक्ती मागणे हे मुळीच चुकीचे नाही.
क्रमश








