मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज 
बेळगाव : टिळकवाडी येथील मराठी टीचर्स ट्रेनिंग (डी.एड्.) कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा साजरी झाली. प्राचार्य एम. बी. हुंदरे अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून किशोर काकडे उपस्थित होते. निमंत्रित म्हणून प्रा. व्ही. पी. महाजन, एस. एन. गोल्याळकर, पी. एम. सुभेदार, के. ए. हगीदाळे, मंगल कुकडोळकर आदींची उपस्थिती होती. विद्यार्थिनींनी गायिलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख पल्लवी चौगुले यांनी करून दिली. त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून किशोर काकडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. महाजन, विद्यार्थ्यांतर्फे माधुरी नाईक, अश्विनी साळुंखे, पल्लवी चौगुले, सुप्रिया शिंदे, अनिरुद्ध सुतार, अर्चना नाईक व साक्षी बेकवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे काकडे यांनी महर्षी व्यास मुनींच्या जीवन आणि कार्याची माहिती दिली. एम. बी. हुंदरे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन श्रुती ताशिलदार व आभार वर्षा मरूचे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवारी सर्वत्र गुरुवंदनाचे कार्यक्रम साजरे झाले. मात्र, दुसरीकडे शहराची स्वच्छता करणाऱ्या महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याचा काहींनी सत्कार करून वेगळ्या प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी केली. दररोज सकाळी शहराची स्वच्छता करणाऱ्यांना यामुळे एक प्रकारे प्रोत्साहन मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टिळकवाडी परिसरात सफाईचे काम करणाऱ्या ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्याचा गुरुवारी काहींनी पुढाकार घेत आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी केली. उपस्थितांनी सफाई कर्मचाऱ्याचे चरण धुवून पूजन केले. त्यानंतर शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आयुष्यभर सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आल्याने एकंदरीत सफाई कर्मचाऱ्यांना एकप्रकारे प्रोत्साहन देण्यात आले आहे. याप्रसंगी नगरसेवक आनंद चव्हाण यांच्यासह वसंत हेब्बाळकर, संजय पाटील व इतर नागरिक उपस्थित होते.
बापट गल्ली स्वामी समर्थ मंदिरात महाप्रसाद
गुरुपौर्णिमा आणि श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बापट गल्लीतील कार पार्किंग परिसरात असलेल्या मंदिरात गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या वेळी शेकडो भक्तांनी मंदिरात उपस्थित राहून स्वामींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर परिसर भक्तिभावाने भरून गेला होता. संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि श्रद्धेचे वातावरण अनुभवायला मिळाले. स्वामी समर्थ यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या भक्तांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्वक पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.
होसूर भैरवनाथ-बसवाण्णा मंदिरात पूजा-अभिषेक
गुरुपौर्णिमेनिमित्त बसवाण गल्ली, होसूर-शहापूर येथील श्री भैरवनाथ व बसवाण्णा मंदिरात गुरुवारी श्री स्वामी समर्थ मूर्ती व पादुकांचा अभिषेक मोठ्या भक्तिभावाने पार पडला. स्वामी समर्थ मूर्ती व पादुकांना सकाळी 11.30 वाजता अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने आरती झाली व भाविकांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला. या प्रसंगी हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावत दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिकतेने भारलेल्या वातावरणात हा सोहळा अत्यंत शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला.
गोवावेस येथील श्री दत्त मंदिर
शहरातील गोवावेस येथील श्री दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवारी सकाळपासून उत्साही वातावरणात पूजा-अर्चा आणि अभिषेक विधी पार पडले. मंदिरात नवनाथांची आकर्षक आरास साकारण्यात आली होती, जी पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दर्शन, पूजन आणि प्रसादाचा लाभ घेत भक्तांनी भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी केली. मंदिर परिसर दिवसभर भक्तिभावाने गजबजून गेला होता.
रुद्रकेसरी मठात विविध कार्यक्रम
येथील रुद्रकेसरी मठात यावर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी सिद्धारुढ स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून काकड आरती करण्यात आली. त्यानंतर 10 वाजता भक्तांच्या उपस्थितीत सद्गुरु श्री हरिगुरु महाराजांची पाद्यपूजा करण्यात आली. याप्रसंगी संसारात व परमार्थात आपले वागणे कसे असावे हे सांगत गुरुआज्ञा प्रतिपालन हेच शिष्याचे प्रमुख लक्षण या विषयावर स्वामीजींनी प्रवचन दिले. त्यानंतर दुपारी 12 वा. मंगलारती करण्यात आली. प्रसादानंतर दिवसभर अखंड नामस्मरण करण्यात आले. संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत भजन व त्यानंतर नित्यनेमाच्या आरतीने उत्सवाची सांगता करण्यात आली.









