बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी उपस्थित होते. यावेळी त्यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन करून शिवरायांच्या कार्याची माहिती करून दिली. संभाजी भिडे गुरूजी म्हणाले, आपण गुरुपौर्णिमा व्यासऋषींना मानून साजरी करतो. पण त्या विश्वाच्या संघर्षात आपण राष्ट्र, हिंदुस्थान म्हणून टिकायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना गुरू मानले पाहिजे. प्रत्येक संकटावरती, परिस्थितीवर विजय कसा मिळवावा, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.
शिवरायांनी जगण्याचा मार्ग दाखविला. तर संभाजी महाराजांनी मरण्याचे धीरोदात्त दाखवून दिले. येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा मोठ्या प्रमाणात काढावी असे त्यांनी धारकऱ्यांना सांगितले. प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. प्रारंभी महिलांच्यावतीने गुरूजींची आरती करून औक्षण करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, प्रचारक हिरामणी मुचंडीकर, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, प्रमोद चौगुले, तुकाराम पिसे यासह इतर उपस्थित होते.









