प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील सादसंगत गुरुद्वारातर्फे रविवारी गुरुनानक यांच्या 553 व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्रीनगर येथून जथ्था बोलाविण्यात आला होता. गुरुनानक यांचे शीख धर्मियांसाठीचे योगदान तसेच त्यांचे साहित्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
गुरुद्वार प्रबंधक कमिटीच्यावतीने भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी सकाळपासूनच शीख बांधवांसमवेत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन धर्मियांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. तसेच शीख भजनांचा जागर केला. मागील तीन दिवसांपासून अखंड पाठ सुरू असून रविवारी त्याची सांगता झाली. सांगता कार्यक्रमाला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई उपस्थित होत्या. गुरुद्वाराच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना कर्नाटक राज्यप्रमुख ओमकार सिंग भाटिया म्हणाले, गुरुनानक यांनी शीख धर्मियांसाठी मोठे काम केले आहे. त्यांचा जयंती उत्सव बेळगावमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा झाला. 800 हून अधिक भाविकांनी लंगरचा आस्वाद घेतला. मिलिटरी, एअरफोर्स यासह विविध सरकारी कार्यालयांमधील अधिकाऱयांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती. सर्व धर्मियांनी मिळून हा उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
रोटरीतर्फे आरोग्य तपासणी
गुरुनानक जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दीडशेहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. वडगाव येथील साई हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. यावेळी रुग्णांचा ईसीजी तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष जी. एस. नायर, सूरज ओझा, पांडुरंग धोत्रे, व्ही. के. सिंग, डॉ. दोडमनी, खुराणा, दुर्गेश हरिते, मंगेश कंटक, सुरेश अजित हलसोडे, पुराणिक, मुकुंद महागावकर, रसुला अरबर यासह इतर सदस्य उपस्थित होते.









