राज्यात आज गुरुपौर्णिमा उत्सव : भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /पणजी
माणसाच्या जीवनात अनेक नाती असतात. काही रक्ताची तर काही त्यापेक्षा घट्ट असतात. त्यातलंच एक नातं म्हणजे मैत्रीचं तर दुसरं गुरु-शिष्याचं. मैत्रीच्या नात्यामुळे जीवन सुखकर होते तर गुरू आपल्या जीवनाला खरा अर्थ देतात. गुरू आपल्या शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर त्याला सुखकर जीवन जगण्याचे मार्गदर्शन करत असतो. आज बुधवारी 13 रोजी सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येत आहे.
आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला गुरुपौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हटले जाते. वेद व्यास यांना प्रथम गुरुचा दर्जा देण्यात आलेला आहे कारण त्यांनी संपूर्ण मानव जातीला चार वेदांचे ज्ञान दिले आहे. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधःकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती.
गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्वाचा सण. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. यादिवशी गुरु पूजन केले जाते.
भारतीय संस्कृतीचे शिल्पकार
महषी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार मानले जातात. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक विषयांसंदर्भात महषी व्यासांनी महाभारत पुराणातील ग्रंथात लिहून ठेवले आहे. त्यांच्या एवढे श्रे÷, आदरणीय असे गुरुजी निर्माण झालेले नाही.
गरु-शिष्यांचे अढळ नाते
आई ही बाळाची पहिली गुरु असते. उत्तम संस्कार करीत ती बाळाला वाढवित असते. परमेश्वराला नमस्कार केल्यानंतर आई म्हणून गुरुचे प्रथम स्थान असते, तर पिता म्हणून त्यांचे द्वितीय स्थान असते. पुरातन काळापासून गुरु-शिष्यांची परंपरा आहे. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये गुरु शिष्याचे नाते दिसून येते. आधुनिक काळात तंत्रज्ञान कितीही बदलले तरी गुरूशिष्यांचे नाते आजही अढळ आहे.
गुरु ज्ञानाचा अथांग सागर
‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते’ या उक्तीप्रमाणे ते आपल्या शिष्याला ज्ञान देत असतात आणि असे असले तरीदेखील शिष्याने गुरुंच्या सेवेमधून मुक्ती मिळण्यासाठी प्रामाणिक असले पाहिजे. गुरु आज्ञेप्रमाणे वागल्यास भविष्यात शिष्याला उत्तम ज्ञान वृंद्धिगत करीत उज्ज्वल यश संपादन करता येते. गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड सागर आहे.
प्राचीनकालीन भारतीय परंपरा
गुरू’ ही संकल्पना आपल्या देशात फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. स्वतःचे घर सोडून ज्ञानसंपादनासाठी गुरुगृही जाऊन राहणे, ही भारतीय परंपरा. अशा वेळेस अर्थातच केवळ विद्या प्राप्त होत नसे, तर शिष्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाकडे गुरूचे लक्ष असे. विशिष्ट विद्या आणि त्याबरोबरच आयुष्याला सामोरे जाण्याचे बळ मिळवून शिष्य गुरुगृहातून परत येत असे. वैयक्तिक आयुष्य सुरू केले तरी गुरूविषयी ऋणभावना मनात कायम राही. तसेच आयुष्यातल्या अवघड वळणावर गरज पडल्यास पुन्हा एकदा गुरूकडे धाव घेण्याचीही मुभा होती. एकदा गुरू-शिष्याचे नाते निर्माण झाले, की ते कायम टिकत असे.
कलेच्या क्षेत्रात आजही गुरू-शिष्य परंपरा कायम दिसते. एखादा उत्तम गाणारा ’कोणाचा शिष्य किंवा शागीर्द’ याची चर्चा असते. वर्षांनुवर्षे गुरूकडून कला अवगत करण्यासाठी धडपडणारे अनेकजण आजही आपल्याला दिसतात.
आजच्या शिक्षक-विद्यार्थ्यांचे नाते
प्रत्येकाच्या मनात आपल्या शिक्षकाप्रती अत्यंत आदराची भावना असते. पण, शिक्षक आता केवळ मार्गदर्शक राहिलेला नाही. काळानुसार हे नातं खूपसं बदललंय. आजचे बरेचसे शिक्षक अभ्यासाव्यतिरिक्तही अनेक गोष्टीत मुलांच्या सोबत असतात. त्यांच्यासोबत ते व्हॉटसऍपवर कनेक्ट असतात, फेस्टिव्हलच्या तयारीत उतरतात. हे असं मित्रत्वाचं नातंच आजच्या विद्यार्थ्यांना हवं आहे. नात्यात मोकळेपणा आला असला, तरी त्यातला आदर मात्र ते कायम राखून आहेत.









