वृत्तसंस्था / बेंगळूर
शुक्रवारी येथे आयोजित केलेल्या इंडियन ग्रा प्री-1 स्पर्धेत पंजाबचा 24 वर्षीय धावपटू गुरिंदरविर सिंगने पुरुषाने 100 मी. धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविताना 10.20 सेकंदाचा कालावधी घेतला आहे.
या स्पर्धेत गुरिंदरविर सिंग रिलायन्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. 2023 च्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत मणीकांत होबलीधरने नोंदविलेला 10.23 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम गुरुविंदर सिंगने मोडीत काढला. गुरिंदरविर सिंगने 2021 साली या क्रीडा प्रकारात 10.27 सेकंदाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली होती. शुक्रवारच्या स्पर्धेमध्ये मणीकांत होबलीधारने 10.22 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान पटकाविले. अमलान बोर्गोहेनने 10.43 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले. गुरिंदरविर सिंगने 2021 आणि 2024 साली झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक स्पर्धेत तसेच 2024 च्या फेडरेशन चषक अॅथलेटिक स्पर्धेत 100 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदके मिळविली होती.









