गुरुद्वाराच्या भिंतीवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा
वृत्तसंस्था/ वँकूवर
भारताला विरोध करण्याच्या नादात खलिस्तान समर्थकांनी आता गुरुद्वाराला देखील लक्ष्य केले आहे. कॅनडाच्या व्हँकूवरमध्ये खलिस्तान समर्थकांनी एका ऐतिहासिक गुरुद्वाराला भारतविरोधी घोषणांनी रंगवून टाकले आहे. गुरुद्वारा व्यवस्थापनाने या तोडफोडीचा आरोप खलिस्तानी संघटनांवर केला आहे. व्हँकूवरमधील खालसा दीवान सोसायटी (केडीएस) गुरुद्वाराच्या भिंतीवर खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी मजकूर लिहिण्यात आला आहे. या गुरुद्वाराला रॉस स्ट्रीट गुरुद्वारा या नावाने ओळखले जाते.
खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या शीख फुटिरवाद्यांच्या एका छोट्या समुहाने खलिस्तान जिंदाबाद यासारख्या विभाजनकारी घोषणांसह आमच्या पवित्र भिंतींना खराब केले आहे असे केडीएसने वक्तव्य जारी करत म्हटले आहे. खलिस्तान समर्थकांनी ही आगळीक शनिवारी मध्यरात्री केली आहे. अज्ञात गुंड ट्रकमधून तेथे पोहोचले आणि गुरुद्वाराच्या गेट आणि बाहेरील भिंतींवर त्यांनी आक्षेपार्ह घोषणा लिहिल्या आहेत. व्हँकूवर पोलीस या घटनेप्रकरणी चौकशी करत असल्याचे केडीएसचे रिकॉर्डिंग सचिव जोगिंदर सुन्नर यांनी सांगितले.
उग्रवाद्यांचे कृत्य
केडीएस व्यवस्थापनाने ही घटना म्हणजेच शीख समुदायात फूट पाडण्याकरता करण्यात आलेले उग्रवाद्यांचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. हे कृत्य उग्रवादी शक्तींकडुन चालविण्यात येणाऱ्या अभियानाचा हिस्सा आहे. हे उग्रवादी कॅनडातील शीख समुदायात भय आणि विभाजन निर्माण करू इच्छितात असे केडीएस व्यवस्थापनाने नमूद केले आहे. 1906 मध्ये स्थापन या गुरुद्वाराने मागील आठवड्याच्या अखेरीस बैसाखी परेड किंवा नगर कीर्तनचे आयोजन केले होते, ज्यात खलिस्तान समर्थक समुहांना भाग घेण्यापासून रोखण्यात आले होते.









