गुरुनानक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तामगावातील (ता. करवीर) लक्ष्मीनगरात कोल्हापूर जिह्यातील पहिल्या गुरुद्वाराची बांधणी केली जात आहे.
संग्राम काटकर कोल्हापूर
मानवता, सलेखा आणि शांतीचा संदेश देणाऱया शीख धर्मियांच्या गुरुद्वार गुरुनानक दरबार साहेब यांचे आता कोल्हापुरात दर्शन घडणार आहे. गुरुनानक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तामगावातील (ता. करवीर) लक्ष्मीनगरात कोल्हापूर जिह्यातील पहिल्या गुरुद्वाराची बांधणी केली जात आहे. या दरबारात शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले श्री गुरु ग्रंथसाहेब (प्रकाश) यांची स्थापना होणार आहे. या ग्रंथासमोर जो बोले सो निहाल हा नामजपही होत राहणार आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील शीख धर्मियांना नामजप करण्याबरोबरच गुरु ग्रंथसाहेबांच्या दर्शनासाठी सांगली, बेळगावातील गुरुद्वाराकडे जावे लागणार नाही. जिह्यात राहणाऱ्या शीख धर्मिय वधु-वरांचे विवाहही परंपरेनुसार गुरुद्वारातच करता येणार आहेत. त्यासाठी आता वधु-वरांच्या नातेवाईकांना गुरुद्वाराची शोधाशोध करावी लागणार नाही.
कोल्हापुरात 65 वर्षापूर्वी शिख सिकलीकर समाज आला. या समाज बांधवांनी कोल्हापूरात घरे बांधून लोखंडाशी संबंधीत व्यवसाय करुन उदरनिर्वाह करु सुरु केला. लहान मुले-तरुण मराठी शाळा, कॉलेजातून शिक्षण घेत घेत चांगल्या पद्धतीने मराठी बोलू लागले. कोल्हापुरातील मराठी बांधवांशी कामांच्या निमित्ताने संपर्क ठेवू लागली. या सगळ्यात हिंदोळ्यात आपले श्रद्धास्थान असलेले गुरुद्वारा गुरुनानक दरबार बांधायचा राहून गेला. मधल्या काळात गुरुद्वारा बांधण्याचा विचार पुढे आला होता. पण काळ आणि वेळ जुळून आली नाही. दोन वर्षापूर्वी मात्र गुरुनानक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनसिंग बावरी यांनी मात्र गुरुद्वारा बांधण्याचे मनावर घेतले. त्यासाठी आपली 3 हजार स्केअर फुट जागा देण्याची तयारी ठेवली.
समाज बांधवांची मोट बांधून बावरी यांनी शिख धर्मातील 10 वे गुरु गोबिंदसिंग यांच्या 2021 साली साजरी झालेल्या जयंतीदिनी गुरुद्वाराची पायाभरणी केली. दरम्यानच्या काळात बांधकामासाठी लोकसहभागातून आर्थिक मदत उभा केली. या मदतीतून एक मजली गुरुद्वारा उभारणीला सुरुवात झाली. पाहता पाहता गुरुद्वाराचा स्लॅब पडून चारी इमारतीच्या भिंती उभारल्या. या इमारतीच्या खालच्या बाजूला गुरु लंगर हॉल (भोजन कक्ष) उभारण्याचे तर वरच्या मजल्यावर श्रद्धास्थान श्री गुरु ग्रंथसाहेब (प्रकाश) यांची स्थापना केली जाणार आहे. त्यानुसार गुरुद्वाराचे अंतरंगातील डिझाईन तयार केले. सध्या गुरुद्वाराचे काम 90 टक्के पूर्ण आहे. दोनच महिन्यांपूर्वी साजरी झालेल्या गुरुनानक जयंतीदिनी गुरुद्वाराच्या दर्शनीला 60 फुट उंचीचे निशान साहेबांची (निसान) उभारणी केली आहे. लवकरच गुरुद्वाराचे उर्वरीत काम पूर्ण गुरु गोबिंदसिंग यांच्या नांदेडमधील सचखंड हजूर साहेब गुरुद्वार येथील समाधी समाधीस्थळावरुन गुरु ग्रंथसाहेब हा ग्रंथ आणला जाणार आहे.
येत्या दीड-दोन महिन्यात मान्यवरांच्या हस्ते गुरुद्वारामध्ये गुरु ग्रंथसाहेब (प्रकाश) यांची स्थापना केली जाईल. याच दिवसापासून हे गुरुद्वार शिख बांधवांसह इतर जाती-धर्मातील लोकांना गुरु ग्रंथ साहेबांच्या दर्शनासाठी खुले केले जाईल. शिख धर्मात वधु-वरांचे विवाह हे गुरुद्वारातील गुरु ग्रंथसाहेबांच्या साक्षीने करण्याची परंपरा आहे. गुरुग्रंथाच्या भोवतीने चार फेरे घेऊन वधूवर एकमेकांना वरमाला घालण्याचीची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा या नव्या गुरुद्वारात सुरु केली जाणार आहे. तेव्हा शीख धर्मातील ज्या वधु-वरांना विवाहासाठी ज्या दिवशी गुरुद्वार हवे आहे, त्या दिवशी ते त्यांना दिले जाणार आहे. तेव्हा आता गुरुद्वाराचे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी थोडी आर्थिक मदत हवी आहे. त्यासाठी शिख सर्व समाज बांधवांनी पुढे यावे, असे आवाहन गुरुनानक चरिटेबल ट्रस्टने केले आहे.
मराठा, सिंधी, सिकलीकर समाजाकडून आर्थिक मदत…
तामगावात 60 फुट लांब व 45 फुट रुंदीच्या आकारात बांधण्यात येत असलेल्या गुरुद्वारासाठी 50 लाख रुपये खर्च आला आहे. मराठा समाजासह शीख सिकलीकर समाज, सिंधी समाज, नेर्ली, तामगावातील लोक व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱयांनी मोठी आर्थिक मदत केली आहे.
गुरुद्वार सर्वांसाठी खुले झाल्यानंतर प्रवचन, लंगर आदी कार्यक्रमही सातत्याने आयोजित केले जातील. शिवाय ज्यांना धार्मिक कार्य करायचे आहे, त्यांनी गुरुद्वाराशी संपर्क साधावा. धनसिंग बावरी (अध्यक्ष : गुरुनानक चॅरिटेबल ट्रस्ट)