आता घरोघरी भेटी देण्यासाठी कसरत : उद्या सायंकाळपर्यंत मतदारांच्या भेटी घेता येणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 10 मे रोजी 224 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी रथी-महारथींनी उमेदवारांच्यावतीने प्रचार केला आहे. रोड शो, प्रचारसभांमधून स्टार प्रचारकांनी पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले आहे. आता सोमवारी सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी 6 पर्यंत गुप्त पद्धतीने प्रचार करता येईल.
सोमवारी सायंकाळपासून मंगळवारी रात्रीपर्यंत उमेदवारांना घरोघरी मतदारांची भेट घेऊन प्रचार करता येणार आहे. सोमवारी सायंकाळनंतर जाहीरपणे प्रचार करता येणार नाही. जाहीर प्रचार संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला ध्वनीक्षेपकाचा वापर करून प्रचारसभा, रोड शोद्वारे मतयाचना करता येणार नाही. शिवाय स्टार प्रचारकांना मतदारसंघाबाहेर जाण्याची सूचना करण्यात आली आहे. संबंधित मतदारसंघातील मतदार यादीत नाव असलेल्या राजकीय नेत्यांनाही बाहेर जाण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे.
रविवारी दिग्गजांकडून प्रचार
सोमवारी जाहीर प्रचार संपणार आसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, निजदचे वरिष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी, भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा, रणदीप सुरजेवाला, महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी पक्षातील उमेदवारांच्या वतीने प्रचार करत अखेरच्या क्षणी मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही प्रचारात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.
अखेरच्या क्षणी प्रचारासाठी उमेदवारांची धडपड
सोमवारी सायंकाळपर्यंत जाहीर प्रचारासाठी मुभा असल्याने सिनेअभिनेते परराज्यातील नेते आणि राज्यातील प्रभावी नेत्यांमार्फत प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी कसरत चालविली आहे. मागील 15 दिवसांपासून भाजप, काँग्रेस, निजद, आम आदमी पक्षासह स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनीही यथाशक्ती प्रचार केला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक रिंगणात एकूण 2613 उमेदवार आहेत. भाजपमधून 224, काँग्रेसमधून 223, निजदमधून 207 जण निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पक्ष 212 जागांवर निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे 184 महिला उमेदवारांसह एक तृतीयपंथी उमेदवारही राजकीय नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे.









