नागरिकांची गैरसोय: कचरा नियोजन कोलमडल्याने नागरिकांत संताप
वार्ताहर/गुंजी
गुंजी ग्रा,,पं.ची कचरागाडी आठवड्यापासून बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. ऐन दसरोत्सवाच्या तोंडावरच कचरागाडी बंद झाल्याने घरच्या साफसफाईचा कचरा टाकायचा कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील कोपऱ्या कोपऱ्यांवर आता कचऱ्याचे ढीग दिसू लागल्याने यात्रेच्या काळात कचरा नियोजन कोलमडल्याने संताप व्यक्त करण्यात आहे. याआधी गावांमध्ये आठवड्यातून किमान दोनवेळा कचरागाडी कचरा संकलन करीत होती. शिवाय इतर खेड्यांमध्येही आठवड्यातून एक दिवस ही गाडी कचरा संकलनासाठी फिरत होती. मात्र दहा-बारा दिवसांपासून नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ही गाडी अचानकपणे बंद झाली.
त्यामुळे याचा परिणाम आठवडी बाजारातील कचरा नियोजनावरही झाला आहे. परिणामी बाजारातील हा कचरा ग्रा.पं.च्या बाजूला चव्हाटा मंदिरामागे पोत्यात भरून टाकण्यात आला. त्यामुळे सदर कचऱ्यातून दुर्गंधी सुटल्याने येथील निवृत्त लष्करी जवानाने त्या कचऱ्याची श्रमदानाने विल्हेवाट लावली. तसेच सध्या गुंजी माउली देवीची मोठी यात्रा दोन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घर साफसफाईची जणू मोहीमच हाती घेतली आहे. मात्र बरेच दिवस कचरा संकलनासाठी कचरागाडी आलीच नाही. शेवटी नागरिकांनी या गाडीची वाट पाहून सदर कचरा आपापल्या सोयीप्रमाणे टाकून दिला. वास्तविक महिन्यापासून ग्रा.पं.ने घरोघरी कचराशुल्क वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र ग्रा.पं.ने कचरागाडी बंद करून अपेक्षाभंगच केला असल्याने येथील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.









