मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे मागणी : नव्या आदेशामुळे परवानाधारकांची होणार गैरसोय
खानापूर : खानापूर तालुक्यात शेतीच्या संरक्षणासाठी घेण्यात आलेल्या बंदूक परवाना नूतनीकरण जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात येणार असल्याचा नवा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बंदूक परवाना नूतनीकरणासाठी खेटा माराव्या लागणार असल्याने तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी समाज कल्याण लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन बंदूक परवाना नूतनीकरण खानापुरात करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले असल्याचे विनायक मुतगेकर यांनी सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या संरक्षणासाठी पीक संरक्षण अंतर्गत बंदुका घेतल्या आहेत. यात तालुक्यात शेती संरक्षण बंदूक परवानधारक 1600 शेतकरी आहेत. यापूर्वी बंदूक परवाना नूतनीकरण खानापूर तहसीलदार कार्यालयातून करण्यात येत होते. मात्र गेल्या वर्षीपासून जिल्हाधिकारी कार्यालयातून नूतनीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाला हेलपाटे मारावे लागत आहेत. हे सर्व शेतकरी अतिशय दुर्गंम भागातील असल्याने त्यांना आपल्या बंदूक परवाना नूतनीकरणासाठी बेळगावला जाणे परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.
पूर्वीप्रमाणेच नूतनीकरण करून द्या
याबाबत बोलताना विनायक मुतगेकर म्हणाले, तालुक्यातील दुर्गंम भागातील शेतकऱ्यांना आपल्या बंदूक परवान्याच्या नूतनीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला जावे लागणार आहे. एकाचवेळी हे नूतनीकरण होणार नसल्याने शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाला हेलपाटे मारावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होणार आहे. यासाठी पूर्वीप्रमाणे तहसीलदार कार्यालयात परवाना नूतनीकरण करून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बंदूक नूतनीकरण परवाना खानापुरातच देण्याचे मंत्र्यांचे आदेश
खानापूर तालुका ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटून याबाबत सविस्तर माहिती दिली. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याबाबत गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. त्यामुळे सध्या खानापूर तहसीलदार कार्यालयात बंदूक नूतनीकरणासाठी लायसन्स जमा करण्यात येत आहेत. यानंतर पुढील महिन्यात तहसीलदार कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बंदुका नूतनीकरणासाठी पाठविण्यात येणार असल्याचे समजते.









