वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बुडापेस्टमधील जिउलाय इस्तवान मेमोरियल हंगेरियन अॅथलेटिक्स ग्रां प्रि स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंगने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. मात्र त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. गुलवीरने ही शर्यत 7 मिनिटे 34.49 सेकंदात पूर्ण केले. याआधी त्याने 7.38.26 मि.चा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. या वर्षी फेब्रुवारीत बोस्टन युनिव्हर्सिटी येथे झालेल्या निमंत्रितांच्या स्पर्धेत त्याने हा विक्रम नोंदवला होता. 27 वर्षीय गुलवीर युरोपमध्ये प्रथमच ट्रॅक रेसमध्ये सहभागी झाला होता. बुडापेस्टमधील ही स्पर्धा वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेन्टल टूर गोल्ड स्पर्धा आहे. केनियाच्या किपसंग मॅथ्यू किपचुम्बाने 7:33.23 मि. वेळ नेंदवत सुवर्ण, मेक्सिकोच्या एदुआर्दो हेरेराने 7:33.58 मि. रौप्य व युगांडाच्या ऑस्कर चेलिमाने 7:33.93 मि. अवधी नोंदवत कांस्यपदक मिळविले. गुलवीरने 13 सप्टेंबरपासून टोकियोत सुरू होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी याआधीच पात्रता मिळविली आहे.









