वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स
येथे रविवारी झालेल्या सनसेट टूरवरील विश्व अॅथलेटिक्स खंडीय अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकाची जलद वेळ नोंदविली. या क्रीडा प्रकारात जलद वेळ नोंदविणारा गुलवीर सिंग हा तिसरा भारतीय धावपटू आहे. मात्र या क्रीडा प्रकारात त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
गुलवीर सिंगने 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत 3 मिनिटे, 36.58 सेकंदाचा अवधी घेतला. 27 वर्षीय गुलवीर सिंगकडून या क्रीडा प्रकारात यापूर्वी जिनसन जॉनसनने नोंदविलेला 3 मिनिटे, 35.24 तसेच परवेज खानने नोंदविलेला 3 मिनिटे, 36.21 सेकंदाचे विक्रम अबाधित राहिले आहेत. गुलवीर सिंगने 3000 मी., 5000 मी. आणि 10,000 मी. धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदविले आहेत. तर त्याने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 5000 आणि 10,000 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळवली आहेत. कोलोरॅडो स्प्रिंग्ज येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी गुलवीर सिंगला लॉस एंजिल्समध्ये 15 जुलै ते 3 सप्टेंबर दरम्यान सराव शिबिरात दाखल व्हावे लागणार आहे. या सराव शिबिरात अविनाश साबळे व पारुल चौधरी यांचाही सहभाग राहिल.









