वृत्तसंस्था/ रांची
येथे सुरू झालेल्या फेडरेशन चषक वरिष्ठांच्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशच्या गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10,000 मी. शर्यतीत सुवर्णपदक पटकावत आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील स्थानही निश्चित केले.
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप्स बँकॉकमध्ये 12 ते 16 जुलै या कालावधीत होणार आहे. गुलवीरने येथील शर्यत 29 मि. 05.90 सेकंदात पूर्ण करीत जेतेपद पटकावले. आशियाई चॅम्पियनशिप्सच्या पात्रता वेळेपेक्षा (29.30) ही सरस वेळ आहे. गुजरातचा आंतरराष्ट्रीय धावपटू मुरली कुमार गावितने 11 वे स्थान मिळविताना 29:27.76 से. वेळ नोंदवली. अव्वल 11 धावपटूंनी 25 लॅप्सच्या या शर्यतीत आशियाई पात्रतेपेक्षा कमी वेळ नोंदवली. एकूण 45 धावपटूंनी त्यात भाग घेतला होता, त्यापैकी 10 जण शर्यत पूर्ण करू शकले नाहीत.
महिलांच्या 10,000 मी. शर्यतीत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने सुवर्ण पटकावताना 33:32.73 से. वेळ नोंदवली. आशियाई चॅम्पियनशिप्स पात्रतेसाठी 33 मिनिटे ही वेळ होती, त्यापैकी तिने जादा वेळ नोंदवल्याने ती पात्र ठरू शकली नाही. यात पाच जणींनी भाग घेतला होता आणि त्यापैकी चौघींनी शर्यत पूर्ण केली.
अन्य क्रीडा प्रकारात उत्तर प्रदेशच्या तानिया चौधरीने महिलांच्या हातोडाफेकमध्ये सुवर्ण मिळविले. तिने 60.54 मी. हातोडाफेक केली. 62.03 मी. ही आशियाई पात्रता मिळविण्याची मर्यादा होती, ती तिला गाठता आली नाही. आंतरराष्ट्रीय अॅथलीट उत्तर प्रदेशच्या सरिता आर. सिंगने 60.45 मी. फेक करीत रौप्य व पंजाबच्या मनप्रीत कौरने 57.08 मी. अंतर नोंदवत कांस्यपदक मिळविले.









