वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीर प्रशासनाने रविवारी प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग आणि पर्यटनस्थळ तंगमर्ग यांना तंबाखू आणि धूरमुक्त क्षेत्र म्हणून घोषित केले. या घोषणेमुळे या क्षेत्रात आता धूम्रपान आणि तंबाखूशी संबंधित सर्व क्रियाकलापांवर पूर्णपणे बंदी असेल. तंबाखूच्या हानिकारक प्रभावांपासून तरुणांना आणि सामान्य जनतेला संरक्षण देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. गुलमर्ग येथे होणाऱ्या ‘खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025’च्या आधी हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामुल्लाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात काही धोकादायक इशारेही स्पष्ट करण्यात आले आहेत.
तंबाखूचे सेवन हे अनेक घातक आजारांचे मुख्य कारण आहे. यामुळे कर्करोग, हृदयरोग आणि फुफ्फुसांच्या समस्या उद्भवू शकतात. देशातील सुमारे 40 टक्के असंसर्गजन्य आजार हे तंबाखूच्या सेवनामुळे होतात. भारत सरकारने 2003 मध्ये सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा लागू केला. या कायद्यान्वये तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती, व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरणावर नियंत्रण ठेवले जाते, अशी माहिती देण्यात आली. सदर कायद्याच्या कलम 4 मध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. यामध्ये सरकारी कार्यालये, कामाची ठिकाणे, कॅन्टीन इत्यादींचा समावेश आहे. तंबाखूचे सेवन करून थुंकल्याने स्वाइन फ्लू, टीबी, न्यूमोनिया आणि पोटाशी संबंधित आजार पसरू शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.









