दोन – तीन महिन्यांत काम पूर्ण होईल : सभापती तवडकर
काणकोण : बहुचर्चित गुळे ते बाळळी रस्त्यापैकी गुळे ते करमल घाटपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्याच्या रूंदीकरणावर 4 कोटी रु. इतका खर्च येणार असून यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सततप पाठपुरावा केल्यानंतर संमती मिळालेली आहे. श्री भूमिपुरुष देवस्थान ते करमल घाट येथील धोकादायक वळणापर्यंतचे हे काम येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे सभापती तवडकर यांनी यावेळी बोलताना सोगितले. यावेळी स्थनिक पंच अक्षदा वेळीप, गणेश वेळीप, नीलेश वेळीप, हमरस्ता विभागाचे साहाय्यक अभियंता नागराज, माजी अभियंता सुभाष पागी, ठेकेदार महम्मद, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो आणि अन्य नगरसेवक उपस्थित होते. गुळे येथील राम वेळीप, घाटू वेळीप यांनी पारंपरिक पद्धतीने पूजा करून व नारळ वाढवून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. करमल घाट ते बाळ्ळीपर्यंतच्या परिसरात साधारणपणे 29 हेक्टर इतकी खासगी, तर 29 हेक्टर इतकी वन खात्याच्या मालकीची जमीन आहे. त्यातील वन खात्याच्या मालकीच्या जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेचे 90 टक्के इतके काम पूर्ण झालेले आहे, तर खासगी जमिनीच्या भूसंपादन आणि अन्य प्रक्रियांसाठी 76 कोटी रु. मंजूर झालेले आहेत. हा विषय अत्यंत संवेदनशील असा असून प्राधान्य देऊन या विषयाकडे आपण लक्ष दिलेले आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत हा विषय सुटणारा नसून विरोधकांनी देखील जरा सबुरीने घ्यावे, असा सल्ला तवडकर यांनी यावेळी दिला. ज्या भागात वारंवार अपघात घडत होते त्या भागाचे काही प्रमाणात रूंदीकरण करण्याच्या कामाला आता प्रारंभ करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर अपघातांचा परिणाम स्थानिक शेतकऱ्यांनाही भोगावा लागत असे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वेळीप यांनी केले.









