ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांना मदतीची आस आहे. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. तसेच पाटलांना शोधून देणाऱ्यास 1100 रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे हजारो गुरढोरं वाहून गेली. पिकंही पाण्याखाली गेली. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीतही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याकडे एकदाही ढुंकून पाहिले नाही, असा आरोप ठाकरे गटाचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष गजानन वाघ यांनी केला आहे.
वाघ यांनी जळगाव जामोद तालुका पोलीस ठाण्यात गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. जो त्यांना शोधून दाखवेल त्याला 1100 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असेही वाघ यांनी जाहीर केले आहे.