ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळे ते जे बोलतील तो आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल. कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते. मात्र, त्यासाठी कुळ बघावं लागेल. गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावं लागेल, असे सूचक वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात बोलताना केलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
अंजली दमानिया यांनी केला होता दावा
काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे ट्विट केलं होतं. “मंत्रालयात कामानिमित्त गेले होते, त्यावेळी तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपसोबत जाणार आहेत. तेही लवकरच.. बघू आणखी किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची” असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेच्या शपथविधीचाही फोटो शेअर केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या भाजप-शिवसेना युतीच्या विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता गुलाबराव पाटलांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.








