बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारतीय संघाचा कर्णधार श्रीनाथ नारायणचे मत
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय बुद्धिबळपटू आणि यंदाच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या संघाचा कर्णधार श्रीनाथ नारायणने डी. गुकेशच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) जागतिक स्पर्धेतील विजयाचे कौतुक केले असून ते देशाला आनंदात एकत्र आणेल आणि आजच्या इंटरनेट व सोशल मीडियाच्या युगात या खेळाला आणखी लोकप्रिय करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
गुकेशने गुऊवारी फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप लढतीच्या शेवटच्या सामन्यात चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून खेळाच्या इतिहासातील सर्वांत तऊण जगज्जेता बनण्याचा मान पटकावला. गुकेशसोबत बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिलेला श्रीनाथ म्हणाला, हा खूप अभिमानाचा क्षण आहे. बुद्धिबळपटूंच्या समुदायाचा एक भाग असल्याने आणि प्रत्यक्ष ही लढत पाहणाऱ्या लोकांचा एक भाग राहिल्याने तसेच सहकारी भारतीय असल्याने मला खूप आनंद होत आहे. मला वाटते की, एक अविश्वसनीय असा टप्पा गाठण्यात आलेला आहे. परंतु हे यश त्याहूनही पुढे, बुद्धिबळ क्षेत्राच्या पलीकडे जाते, असे मत त्याने व्यक्त केले.
‘अशा प्रकारे जिंकणे संपूर्ण देशाला आनंदोत्सवात एकत्र आणते. आम्ही भारतीय खेळांमध्ये हे अनेकदा पाहिले आहे. भारताने 1983 चा विश्वचषक जिंकला, 2011 चा विश्वचषक जिंकला आणि जेव्हा विश्वनाथन आनंद जगज्जेता झाला तेव्हा आम्ही हे पाहिलेले आहे. आम्ही हे जगज्जेतेपद सुमारे 11 वर्षांपूर्वी गमावले होते (त्यावेळी म्हणजे 2013 मध्ये आनंदला मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावे लागले होते) आणि आता ते परत आल्याने मला खूप आनंद झाला आहे’, असे श्रीनाथ नारायणने सांगितले.
श्रीनाथने असा आशावाद देखील व्यक्त केला की, अशा विजयामुळे बुद्धिबळ आणखी लोकप्रिय होईल. हे लक्षात घ्यायला हवे की, कोविड-19 नंतर आणि 2020 नंतर या खेळाच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. कोविडने लोकांना त्यांच्या घरात बंदिस्त केले आणि त्यांना वेळ घालविण्यासाठी किंवा छंद म्हणून इनडोअर तसेच बोर्ड गेमच्या जवळ आणले, याकडे त्याने लक्ष वेधले.
बुद्धिबळ हा असा खेळ आहे की, इतर काही शारीरिक खेळांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची त्याला आवश्यकता नसते. त्यासाठी ट्रॅक अँड फिल्ड किंवा मोठ्या स्टेडियमची आवश्यकता नसते. आपल्याला फक्त फोन आणि डेटाची आवश्यकता असते, जे आज बऱ्याच भारतीयांकडे आहे. मला वाटते की, भारताला अनुकूलता आहे. कारण आमच्याकडे संख्येची अनुकूलता आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या गुणवत्तेची अनुकूलता आहे, असे श्रीनाथ नारायण म्हणाला.









