वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारतीय आव्हानवीर डी. गुकेशने रविवारी विजय नोंदविल्यानंतर सोमवारी गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनविऊद्ध 12 व्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील लढतीत दोन्ही खेळाडू पुन्हा समान पातळीवर पोहोचले आहेत. 18 वर्षीय गुकेशने रविवारी लढतीतील आपला दुसरा विजय नोंदविल्यानंतर तो एका गुणाने पुढे गेला.
सलग सात बरोबरीनंतर रविवारी या विजयाची नोंद झाली होती. परंतु सोमवारी लिरेनच्या विजयाने गोष्टी पुन्हा स्थिरावल्या. हे दोन्ही खेळाडू आता प्रत्येकी 6 गुणांवर आहेत आणि 14 फेऱ्यांच्या क्लासिकल टाइम कंट्रोल पद्धतीत फक्त दोन सामने शिल्लक आहेत. जेतेपद जिंकण्यासाठी त्यांना अद्याप 1.5 गुणांची गरज आहे.
मंगळवारच्या विश्रांतीनंतर बुधवारी आणि गुऊवारी उर्वरित दोन सामने खेळवले जातील. बुधवारच्या पुढील सामन्यात काहीही झाले तरी, लढतीत पूर्ण 14 फेऱ्या खेळविल्या जातील हे निश्चित झाले आहे आणि बहुदा लढत टायब्रेकरवर जाण्याची जास्त शक्यता आहे. तिथे विजेता निश्चित करण्यासाठी कमी वेळेचे सामने खेळविले जातील. गुकेशने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यापूर्वी 32 वर्षीय लिरेनने सुऊवातीचा सामना जिंकला होता. दुसरा आणि चौथ्यापासून दहाव्यापर्यंत सारे सामने अनिर्णीत राहिले होते.
लिरेनने पांढऱ्या सोंगाट्यासह सोमवारी त्याचा पहिला विजय मिळवला. गुकेशची तयारी त्याने येथे खेळलेल्या इतर 11 सामन्यांइतकी चांगली दिसली नाही. चिनी खेळाडूने इंग्लिश ओपनिंग वापरली आणि गुकेश पुढे अशा स्थितीत गेला ज्यामुळे रंग बदलला. लिरेनच्या एका सुरेख युक्तीने खेळाचा शेवट झाला. हा सामना 39 चालींमध्ये संपला. गुकेश आजच्या शेवटच्या विश्रांतीच्या दिवसानंतर त्याच्या शेवटच्या पांढऱ्या सोंगाट्यानिशी खेळायच्या सामन्यात कशी कामगिरी करतो त्यावर बरेच काही अवलंबून असेल. लिरेनने मात्र पुन्हा सिद्ध केले आहे की, त्याला मात देणे कठीण आहे आणि या लढतीतील त्याचा दुसरा विजय दोन्ही बाजूंना संधी असलेल्या इतर सामन्यांच्या तुलनेत एकतर्फी राहिला.









