वृत्तसंस्था/विज्क अॅन झी (नेदरलँड्स)
जागतिक विजेता डी. गुकेशने तांत्रिकदृष्ट्या कुशल प्रयत्न करून जर्मनीच्या विन्सेंट कीमरला हरवले आणि टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीच्या समाप्तीनंतर आपली गुणसंख्या 3.5 गुणांवर नेली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह भारतीय खेळाडूने लाईव्ह रेटिंगमध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने लिओन ल्यूक मेंडोन्सासोबत बरोबरी साधणाऱ्या अर्जुन एरिगेसीला मागे टाकले आहे. स्पर्धेत आठ फेऱ्या शिल्लक असताना पहिला विश्रांतीचा दिवस आज शुक्रवारी असून दोन विजय आणि तीन बरोबरीसह गुकेश आर. प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानचा अब्दुसत्तोरोव्ह नोडीरेक यांच्या मागे आहे. गुकेशने पांढऱ्या सेंगाट्यांसह खेळताना निमझो-इंडियन डिफेन्स गेममध्ये कीमरला काहीही संधी दिली नाही. भारतीय खेळाडूने खेळावर मजबूत नियंत्रण मिळवले आणि तांत्रिक बाबी अचूक पद्धतीने हाताळल्या. हा दिवसाचा शेवटचा सामना होता आणि तो 72 चाली इतका चालला. परंतु गुकेशला सूर मिळाल्यावर कोणालाही निकाल काय राहणार याबद्दल शंका राहिली नव्हती.
प्रज्ञानंद काळ्या सोंगाट्यांसह खेळताना आक्रमक खेळ करू शकला नाही आणि हॉलंडच्या मॅक्स वॉर्मरडॅमशी त्याने बरोबरी साधली, तर अब्दुसत्तोरोव्हने आणखी एका स्थानिक खेळाडू जॉर्डन व्हॅन फॉरेस्टला मागे टाकले. यामुळे पाचव्या फेरीच्या शेवटी प्रज्ञानंद आणि अब्दुसत्तोरोव्ह हे दोघेही प्रत्येकी चार गुणांसह आघाडीवर राहिले आहेत, तर गुकेश स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्हसह फक्त अर्धा गुण मागे आहे. फेडोसेव्ह हा अमेरिकेच्या अव्वल मानांकित आणि रेटिंगनुसार फेव्हरेट फॅबियानो काऊआनाविऊद्ध विजय मिळवून दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू राहिला. एरिगेसीने त्याचा सहकारी मेंडोन्सासोबत बरोबरी साधली, तर पी. हरिकृष्णलाही गतविजेत्या चीनच्या वेई यीविऊद्ध काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना फारशी काही करामत करता आली नाही. तीन गुणांसह हरिकृष्ण आघाडीवरील खेळाडूंपासून लक्षणीय अंतरावर आहे. जेतेपदाच्या शर्यतीत येण्यासाठी त्याला विजयपथावर परत यावे लागेल.









