वृत्तसंस्था/ विज्य अॅन झी (नेदरलँड्स)
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेची सहावी फेरी आज शनिवारी हाणार असून शुक्रवारच्या विश्रांतीच्या दिवसानंतर आज उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हचा जागतिक विजेता डी. गुकेश सामना करेल, तर आर. प्रज्ञानंद गतविजेत्या चीनच्या वेई यीचा सामना करताना आपले अव्वल स्थान अधिक पक्के करण्याची आशा करेल.
प्रज्ञानंद आणि अब्दुसत्तोरोव्ह पाच फेऱ्यांनंतर प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत, तर गुकेश स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्हसह 3.5 गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. पी हरिकृष्ण अर्ध्या गुणाने त्यांच्या मागे असून वर्षाच्या या पहिल्या सुपर स्पर्धेत आठ फेऱ्या अजून बाकी आहेत. प्रज्ञानंदने या स्पर्धेत आतापर्यंत प्रभावी कामगिरी केलेली असून त्याने भारतीय खेळाडूंवर तीन विजय मिळवले आहेत आणि दोन सामने बरोबरीत सोडवले आहेत.
अर्जुन एरिगेसी, पी. हरिकृष्ण आणि लिओन ल्यूक मेंडोन्सा यांच्याविऊद्धच्या विजयांमुळे प्रज्ञानंद जागतिक क्रमवारीत टॉप-टेनमध्ये पोहोचला असून तो पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदपेक्षा किंचित पुढे आहे. दरम्यान, गुकेश विश्वविजेता बनल्यानंतरच्या पहिल्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करून एरिगेसीला मागे टाकत जागतिक चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने गुंतागुंतींमधून मार्ग काढलेला आहे आणि हॉलंडच्या अनिश गिरीविऊद्ध जवळजवळ गमावलेला सामना त्याने बरोबरीत सोडवला, तर पाचव्या फेरीत जर्मनीच्या विन्सेंट कीमरविऊद्ध त्याने मिळविलेला विजय त्याची नेहमीची झलक दाखविणारा होता.
हरिकृष्णने प्रज्ञानंदविऊद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता चांगली कामगिरी केली आहे आणि सहाव्या फेरीत तो हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टचा सामना करेल. एरिगेसी 2800 गुणांच्या क्लबमधून बाहेर असून त्याला पहिल्या पाच फेऱ्यांतून फक्त एक गुण मिळाला आहे. पुढच्या फेरीत तो फॅबियानो काऊआनाशी सामना करेल. पदार्पण करणाऱ्या मेंडोन्सासाठी कीमरविऊद्धचा पहिल्या फेरीतील पराभव हा निराशाजनक असला, तरी त्यानंतर त्याने दोन बरोबरी साधून एक गुण मिळवला आहे. निराशाजनक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एरिगेसी आणि मेंडोन्सा या दोघांनाही उर्वरित फेऱ्यांमध्ये चांगले गुण मिळवावे लागतील. चॅलेंजर्स विभागात आर. वैशालीला इरिना बुलमागाचे, तर दिव्या देशमुखला जगातील सर्वांत तऊण इंटरनॅशनल मास्टर फॉस्टिनो ओरोचे आव्हान पेलावे लागेल.









