वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर (नॉर्वे)
आजवरचा सर्वांत तरुण जगज्जेता गुकेश डोम्माराजू हा पुढील वर्षी होणाऱ्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जगातील सर्वोच्च मानांकित खेळाडू मॅग्नस कार्लसनशी भिडणार असून ही स्पर्धेतील अत्यंत उत्सुकतेने वाट पाहिली जाणारी लढत आहे. ही स्पर्धा 26 मे ते 6 जून, 2025 या कालावधीत स्टॅव्हेंजर येथे होणार आहे.
18 वर्षीय गुकेशने यावर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याने टाटा स्टील मास्टर्स जिंकली, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, कँडिडेट्स स्पर्धेवर वर्चस्व गाजविले आणि शेवटी क्लासिकल बुद्धिबळातील सर्वोच्च किताब मिळविताना गेल्या आठवड्यात सिंगापूर येथे जगज्जेतेपद पटकावले.
नॉर्वेमध्ये पुन्हा जगातील सर्वांत बलाढ्या खेळाडूंना सामोरे जाण्यास मी उत्सुक आहे आणि आर्मागेडन देखील मजेदार असेल, असे गुकेशने एका निवेदनात म्हटले आहे. 2023 मध्ये गुकेशने स्टॅव्हेंजरमध्ये तिसरे स्थान पटकावले होते. आता तो जगज्जेता म्हणून सहभागी होणार असून कार्लसनला त्याच्या घरच्या मैदानावर आव्हान देण्यास सज्ज झाला आहे.
हा उगवता तारा विजय मिळवेल की, कार्लसनचा अनुभव आणि मायदेशी खेळण्याची अनुकूलता त्याला फायदेशीर ठरेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. नॉर्वे चेसचे संस्थापक आणि स्पर्धा संचालक केजेल मॅडलँड यांनी म्हटले आहे की, ही लढत खरोखरच अनोखी ठरणार आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनला जगातील सर्वोच्च क्रमांकावरील खेळाडूचा सामना करताना पाहणे रोमांचकारी ठरणार आहे.









