वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर
स्टॅव्हेंजर येथील नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआनाने स्टार भारतीय खेळाडू डी. गुकेशला पराभूत करून तीन पूर्ण गुण मिळवल्यानंतर पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनने त्याचे या स्पर्धेतील सातवे विजेतेपद पटकावले. गुकेशसाठी हा एक अविस्मरणीय दिवस ठरला. कारण 2018 च्या नॉर्वे बुद्धिबळ विजेत्या काऊआनाविऊद्ध प्रतिकूल स्थितीत राहिल्यानंतर त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा, पण भारतीय खेळाडूचा वेळ संपत आल्याने त्या गडबडीत त्याने एक मोठी चूक केली आणि लगेचच त्याला त्याच्या संधी हातातून निसटल्या आहेत हे कळून चुकले.
घड्याळात फक्त दोन सेकंद शिल्लक असताना गुकेशने हस्तांदोलन केले आणि नंतर निराशेने हातांनी चेहरा झाकला. भारतीय युवा विश्वविजेत्यासाठी दुसऱ्याच सहभागात नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी होती. त्याने खराब सुऊवात केली होती, पण नंतर मॅग्नस कार्लसन, देशबांधव अर्जुन एरिगेसी आणि चीनच्या वेई यी यांच्यावर प्रभावी क्लासिकल विजय मिळवून त्याने परिस्थिती बदलली.
गतविजेता कार्लसन, जो नवव्या फेरीनंतर 15 गुणांसह आघाडीवर होता, त्याने 10 व्या फेरीत एरिगेसीविऊद्धच्या सामन्यात कोंडीत अडकल्यानंतर शानदार पद्धतीने स्वत:ची सुटका केली आणि सामना बरोबरीत सोडवत 16 गुणांसह स्पर्धेचा शेवट केला. 2023 च्या स्पर्धेप्रमाणेच गुकेशने 14.5 गुणांसह तिसरे स्थान पटकावले, तर काऊआना 15.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. एरिगेसीने 13 गुणांसह पाचवे स्थान पटकावले. नॉर्वेजियन खेळाडूने चमत्कारिक पद्धतीने बरोबरी साधल्यानंतर एरिगेसीने कार्लसनविऊद्ध आर्मागेडन टायब्रेक जिंकला होता, परंतु त्याचा काही फरक पडला नाही. कारण पाच वेळच्या जगज्जेत्या खेळाडूने जेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने आवश्यक एक गुण आधीच मिळवला होता.
काऊआनाविऊद्ध पराभव झाल्यानंतर गुकेश शांतपणे सामन्याच्या ठिकाणाहून बाहेर पडला, तर कार्लसन म्हणाला की, अर्जुन एरिगेसीविऊद्धच्या सामन्यात टिकून राहण्यासाठी त्याला अक्षरश: निकराने लढावे लागले. नॉर्वेजियन खेळाडूचा पराभव झाल्यास तो विनाशकारी ठरला असता, कारण गुकेश-काऊआना सामना त्यावेळी सुरू होता आणि दोघांपैकी कुणीही क्लासिकल विजय मिळवला असता, तर त्याच्या सातव्या नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपदाच्या आणि त्यासोबतच्या अंदाजे 69,500 डॉलर्सचे बक्षीस मिळविण्याच्या आशा धुळीस मिळाल्या असत्या. जर गुकेश अमेरिकन ग्रँडमास्टरविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविण्यात यशस्वी झाला असता आणि जर कार्लसनने एरिगेसीविऊद्धचा क्लासिकल सामना गमावला असता, तर गुकेशचे जेतेपद निश्चित होते.
महिला गटात आघाडी घेतलेली आणि दोन वेळची जागतिक ब्लिट्झ विजेती युक्रेनची अॅना मुझीचुक हिला अंतिम फेरीत आर्मागेडन टायब्रेकमध्ये भारताच्या आर. वैशालीकडून पराभव पत्करावा लागला असला, तरी 16.5 गुणांसह तिने विजेतेपद जिंकले. भारतीय खेळाडूविऊद्धच्या क्लासिकल गेममध्ये मुझीचुकने बरोबरी साधल्याने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी एक गुण मिळाला, तर वैशालीने आर्मागेडन सडन डेथमध्ये युक्रेनियन खेळाडूला हरवून आणखी अर्धा गुण मिळवत आपली गुणसंख्या 11 वर नेली.
जर वैशालीने क्लासिकल गेममध्ये मुझीचुकला पराभूत केले असते, तर तिने युक्रेनियन ग्रँडमास्टरला तीन गुणांपासून वंचित ठेवले असते. तशा परिस्थितीत कोनेरू हम्पीने चिनी विश्वविजेती जू वेनजुनला हरदवल्यास तिला जेतेपद मिळाले असते. दुर्दैवाने हम्पीला पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने फक्त एक गुण मिळाला. त्यानंतर तिने आर्मागेडन टायब्रेकमध्ये वेनजुनवर मात करून आणखी अर्धा गुण मिळवला. 15 गुणांसह हम्पीने तिसरे स्थान मिळवले.









