वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी, नेदरलँड्स
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत जागतिक विजेता डी. गुकेशने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हसोबतचा सामना बरोबरीत सोडविला तसेच आर. प्रज्ञानंदने देखील गतविजेत्या चीनच्या वेई यीसोबत बरोबरी साधली. शनिवारी डी मोरियान येथे झालेल्या 14 खेळाडूंच्या या राउंड-रॉबिन स्पर्धेत केवळ एका निर्णायक सामन्याची नोंद झाली. अब्दुसत्तोरोव्ह आणि प्रज्ञानंद यांनी 4.5 गुणांसह आपली संयुक्त आघाडी कायम ठेवली अहे, तर गुकेश चार गुणांसह त्यांच्या मागे आहे.
वर्षाच्या या पहिल्या प्रमुख स्पर्धेत अजूनही सात फेऱ्या खेळायच्या बाकी आहेत. पी. हरिकृष्ण, सर्बियाचा अॅलेक्सी सरना आणि स्लोव्हेनियाचा व्लादिमीर फेडोसेव्ह हे प्रत्येकी 3.5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत आणि आघाडीच्या खेळाडूंपासून लक्षणीय अंतरावर आहेत. अब्दुसत्तोरोव्हविऊद्धच्या आव्हानात्मक सामन्यात गुकेशने 64 चालींनंतर बरोबरी साधली. या सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय खेळाडूवर मोठा दबाव आला होता. कठीण स्थितीत असूनही गुकेशने पुन्हा एकदा आपली बचावात्मक लवचिकता दाखवली आणि प्रतिस्पर्ध्याच्या चुकीचा फायदा घेत सामना बरोबरीकडे नेला.
वेई यीविऊद्ध पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना प्रज्ञानंदने कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु चिनी खेळाडूने सातत्याने प्रत्युत्तर दिले आणि 58 चालींनंतर खेळ अनिर्णित राहिला. दुसरीकडे, हरिकृष्णने नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टविऊद्ध आशा निर्माण केल्या होत्या, परंतु शेवटी हा सामना बरोबरीत संपला. पहिल्या फेरीपासून दबावाखाली असलेल्या अर्जुन एरिगेसीने पांढऱ्या सोंगाट्यासह खेळताना अतिशय सावधगिरी बाळगली आणि बर्लिन डिफेन्स गेममध्ये अमेरिकेच्या टॉप रेटेड फॅबियानो काऊआनासोबत लगेच बरोबरी साधली.
लिओन ल्यूक मेंडोन्सानेही नेदरलँड्सच्या मॅक्स वॉर्मरडॅमसोबतही बरोबरी साधली,. ज्यामुळे त्याचे अर्जुनइतकेच 1.5 गुण झाले आहेत. चॅलेंजर्स विभागात आर. वैशालीला रोमानियाच्या इरिना बुलमागाविऊद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले, तर अर्जेंटिनाच्या 11 वर्षीय फॉस्टिनो ओरोने दिव्या देशमुखचा पराभव केला.









