वृत्तसंस्था/सेंट लुईस, अमेरिका
ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत पहिल्या दिवशी विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशने अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनविऊद्ध पहिल्या फेरीत झालेल्या पराभवानंतर पुनरागमन केले आणि तो दिवसअखेरीस संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर राहिला. गुकेशला एका गुंतागुंतीच्या सुऊवातीच्या फेरीच्या लढाईत अॅरोनियनने पराभूत केले, परंतु त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन करताना ओपेरिनविऊद्ध दणदणीत विजय मिळवला आणि नंतर लिएमला हरवून दिवसाचा शेवट सहापैकी चार गुणांसह केला. प्रत्येक जलद विजयाचे दोन गुण पटकावताना अॅरोनियनने पहिल्या दिवशी तिन्ही सामने जिंकून सुऊवातीची आघाडी घेतली. लास वेगासमध्ये नुकत्याच संपलेल्या फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद मिळविलेल्या अमेरिकी ग्रँडमास्टरने प्रमुख प्रतिस्पर्धी उझबेकिस्तानचे नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि फ्रान्सचा मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह यांना हरवून परिपूर्ण गुण मिळविले.
अॅरोनियन सहा गुणांसह आघाडीवर आहे, तर दोन विजय आणि एका बरोबरीच्या जोरावर त्याच्या पाठोपाठ त्याचा सहकारी फॅबियानो काऊआना पाच गुणांसह आहे. गुकेश अन्य एक अमेरिकी खेळाडू वेस्ली सोसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर वाचियर-लाग्रेव्ह आणि लीनियर दुमिंगेझ पेरेझ हे प्रत्येकी तीन गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. लिएम आणि ओपरिन दोन गुणांसह त्याच्या पुढील स्थानावर आहेत, तर नोदिरबेकचा एक गुण झालेला आहे आणि सॅम शँकलँड त्याचे सर्व गेम गमावल्यानंतर शेवटच्या स्थानावर आहे. गुकेशसाठी पहिली फेरी धक्कादायक ठरली. कारण तो कॅरो कान बचाव पद्धतीतून उद्भवलेल्या गुंतागुंतींमध्ये सापडला. तथापि, तो लवकर सावरला आणि त्याने ओपरिनला हरवले. दिवसाच्या शेवटच्या सामन्यात लिएमविऊद्ध काळ्या रंगाच्या सेंगाट्यांसह खेळताना गुकेशने पुन्हा मोठ्या गुंतागुंतींमध्ये प्रवेश केला. परंतु अॅरोनियनच्या विपरित येथे लिएम दबावाखाली डगमगला आणि त्याला सामना गमवावा लागला.









