वृत्तसंस्था/ झाग्रेब, क्रोएशिया
सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक विजेता डी. गुकेश आर. प्रज्ञानंदकडून पराभूत झाला असून 15.5 गुणांनिशी मॅग्नस कार्लसनपेक्षा दोन गुणांनी मागे पडला आहे. जवळजवळ सर्व प्रतिस्पर्ध्यांची बचावफळी मोडून काढल्यानंतर आणि दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस तीन गुणांची आघाडी घेतल्यानंतर गुकेशने आपली गती गमावली आहे.
ब्लिट्झ विभागात त्याने पाच पराभवांसह सुऊवात केली आणि नंतर सहावा गेम बरोबरीत सोडविला, तर सातवा पुन्हा गमावला. आठवा गेम जिंकल्यानंतरही गुकेश अखेर प्रज्ञानंदकडून पराभूत झाला. दरम्यान, कार्लसन त्याच्या नऊ सामन्यांमधून तब्बल 7.5 गुणांसह आघाडीवर परतला आहे. गेल्या स्पर्धेत या नॉर्वेजियनने त्याचे शेवटचे नऊ सामने जिंकून विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे आताची त्याची कामगिरी ही भविष्यात काय घडणार त्याचे संकेत असू शकते.
रॅपिड गटात गुकेशने त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा अनुभव घेतला होता, ज्यामध्ये त्याने कार्लसनविऊद्धच्या एका गेमसह तब्बल सहा गेम जिंकले होते. परंतु ब्लिट्झमध्ये हा भारतीय खेळाडू खूपच मागे राहिला. त्यामुळे खेळाच्या सर्वांत वेगवान आवृत्तीच्या पहिल्या दिवशी त्याला सहा गेम गमावावे लागले. शेवटच्या दिवशी कोण आघाडीवर राहील हे पाहावे लागणार आहे. सध्या तरी संभाव्य 27 पैकी 17.5 गुणांसह कार्लसन हा किताबासाठी प्रबळ दावेदार बनून उभरला आहे. पोलंडच्या डुडा जान-क्रिज्स्टोफवर त्याची 1.5 गुणांची आघाडी आहे. डुडाने ब्लिट्झच्या पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली.
ब्लिट्झ विभगात अजून नऊ फेऱ्या बाकी असल्याने उर्वरित लढतींतून सहा गुण मिळवून कार्लसन जिंकण्याची शक्यता आहे. परंतु या स्वरुपात गुकेश पूर्णपणे अपयशी ठरला असल्याने त्याला पुनरागमनासाठी बरीच चांगली कामगिरी करावी लागेल. कार्लसनने यापूर्वी गुकेश हा इतर स्वरुपांत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही असे म्हटले होते, तर गुकेशने रॅपिड चेसमध्ये त्याला चुकीचे सिद्ध केले होते. आता ब्लिट्झमध्येही विश्वविजेत्याला स्वत:स सिद्ध करावे लागेल.









