वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताचा आव्हानवीर डी. गुकेश आणि गतविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यात बुधवारी येथे झालेला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील आठवा सामनाही बरोबरीत संपला. ही सलग पाचवी बरोबरी आहे. अनिर्णीत राहिलेल्या सामन्यामुळे दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी 4 गुण झालेले आहेत, विजेतेपद जिंकण्यासाठी त्यांना आणखी 3.5 गुणांची गरज आहे.
दोन्ही खेळाडूंनी 51 चालींनंतर सामना बरोबरीत सोडविला. 14 फेऱ्यांच्या लढतीतील ही एकंदरित सहावी बरोबरी आहे. 32 वर्षीय लिरेनने सुऊवातीचा सामना जिंकला होता, तर 18 वर्षीय गुकेशने तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता. दुसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा सामना बरोबरीत संपला होता. लिरेनने जास्त जोखीम न पत्करण्याचा निर्णय घेतला आणि क्लिष्ट स्थितीत पुढे जाणे शक्य असतानाही बरोबरीवर समाधान मानले.
हा सामना चार तासांहून अधिक काळ चालला. लिरेनने सामन्यात वाया घालविलेल्या संधी पाहता गुकेश फायदा घेईल असे वाटत होते. 2.5 दशलक्ष डॉलर्सचे इनाम असलेल्या या स्पर्धेमध्ये फक्त सहा सामने बाकी आहेत आणि 14 फेऱ्यांनंतरही बरोबरी कायम राहिल्यास विजेता निश्चित करण्यासाठी अधिक वेगवान वेळेच्या नियंत्रणाखाली सामने होतील.
पुढील दोन सामने कदाचित लढतीच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतील. गुकेशने सुऊवातीला बरोबरी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला तेव्हा सारे आश्चर्यचकित झाले. गुकेशने बरोबरी मान्य केल्यास हा सामना जास्त आधी संपला असता. ‘मी वाईट स्थितीत आहे असे मला वाटले असते, तर मी बरोबरी मान्य केली असती. पण मी तसे केले नाही. मला असे वाटले नाही की, मी धोक्यात आहे. मला वाटले की, कदाचित काही संधी मिळतील. पण ठीक आहे, स्थितीचा अंदाज बांधण्यात थोडा चुकलो’, असे गुकेश नंतर म्हणाला.









