आज 13 वा सामना, शेवटच्या टप्प्यात दबावाला तोंड देण्याच्या क्षमतेचा कस लागणार
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील लढतीच्या आज बुधवारी येथे होणाऱ्या 13 व्या सामन्यात गतविजेत्या डिंग लिरेनचा सामना करणार असून एक सुलभ आघाडी गुकेशच्या पकडीतून निसटली असली, तरी पुन्हा उसळी घेण्याचा दृढ संकल्प करून तो उतरेल यात शंका नाही. ही लढत दोन्ही खेळाडूंसाठी हेलकावे खायला लावणारी राहिली आहे.
18 वर्षीय गुकेश हा विश्वविजेतेपदासाठीचा सर्वांत तरुण आव्हानवीर असून तो आणि चीनचा 32 वर्षीय गतविजेता यांच्यात चुरशीची लढत रंगली आहे. त्यात दोघांनीही फार काळ आघाडी टिकविता आलेली नाही. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी ते पुन्हा लढतीत उतरतील. गुणसंख्या सध्या 6-6 अशी बरोबरीत आहे आणि जो खेळाडू प्रथम 7.5 गुणांवर पोहोचेल त्याला प्रतिष्ठित मुकुट मिळणे निश्चित होईल.
अवघे तीन सामने बाकी राहिलेले असताना पूर्ण गुणांची आघाडी गमावणे आणि 12 व्या फेरीत पराभव स्वीकारावा लागणे हे तऊण भारतीय खेळाडूसाठी अगदीच धक्कादायक होते. अनेक तज्ञांना वाटते की, गुकेश त्याच्या पांढऱ्या सोंगाट्यानिशी खेळणार असलेल्या शेवटच्या सामन्यात ‘क्लासिकल टाइम कंट्रोल’खाली आक्रमक दृष्टिकोन स्वीकारेल. लढतीच्या या शेवटच्या टप्प्यात दबावाला तोंड देण्याची क्षमता महत्त्वाची भूमिका बजावेल असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
10 व्या सामन्यानंतर गुणसंख्या 5-5 अशी बरोबरीत होती. परंतु त्यानंतरच्या मागील दोन निर्णायक सामन्यांनी या लढतीला नवीन ऊर्जा मिळवून दिली आहे. या लढतीत दोन्ही खेळाडूंसमोर संधी चालून आलेल्या आहेत. 11 व्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर 12 व्या सामन्यात गुकेश नेहमीप्रमाणे सुरात दिसला नाही आणि प्रथमच नवीन डावपेच वापरण्याची त्याची संकल्पना त्याच्यावरच उलटली.
2.5 दशलक्ष डॉलर्सची इनामाची रक्कम असलेल्या या स्पर्धेत शेवटपर्यंत गुणसंख्या बरोबरीत राहिल्यास विजेता निश्चित करण्यासाठी कमी कालावधीचे टायब्रेकर सामने खेळविले जातील. लिरेनच्या इयान नेपोम्नियाचीविऊद्धच्या मागील जागतिक अजिंक्यपद लढतीतही अशीच परिस्थिती राहिली होती. सदर लढत अखेरीस टायब्रेकरवर लिरनने जिंकली होती.









